पान:कार्यशैली.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९४. मनाला साद


 एकदम अचूक वेळेला अचूक भाषेत फोन करून तुम्हांला गारद करण्यात दिलराज बक्षीचा हात कुणीही धरू शकणार नाही.त्यात त्याचं नावही दिलराज,त्यामुळं अचूक टायमिंगनं तो तुमच्या 'दिल' वर राज्य करणार हे नक्कीच.
 काल सकाळी साडेनऊ वाजता माझं एक महत्त्वाचं प्रेझेन्टेशन एका मोठ्या मीटिंगमध्ये होतं. सकाळी नऊच्या सुमारास कॉन्फरन्स रूमच्या पाय-या चढताना नेमका त्याचा एस.एम.एस आला.त्यात तो म्हणतो कसा: ऐटीत सैर कर मित्रा. विजय तुझाच आहे. मी खूपच सुखावलो. दिलराजचा हात पाठीवर पडला असं वाटलं.
 वाढदिवस तो कधी म्हणजे कधी चुकत नाही.त्याला हेही माहीत आहे की पहाटे सहा वाजता मी फिरायला समुद्रावरच असणार.मला बरोबर तिथं फोन येणार. अचूक.

 दिलराजचं हे फक्त माझ्याबाबतीतच आहे, असं नाही. त्याला जगाचं भान असतं. कोण, कुठे. कुठल्या मानसिक अवस्थेत असणार याचा अचूक अभ्यास त्याचा सतत चालू असतो, आणि त्याचं हे तुमच्या मनाला साद घालण्याचं काम अखंड, अविरत चालूच असतं.

१२७। कार्यशैली