पान:कार्यशैली.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८९. तंत्र पद्धती आणि शैली


 पाण्याची गंमत बघा कशी आहे ? पाणी आपण वळवू तसं वळतं. सहज बाजूला करायचं म्हटलं तरी करता येतं. पाणी कोमल आहे. त्याला रंग नाही की वास नाही. वाटतं पाण्याची अशी खास ताकद नाहीच मात्र तेच पाणी जेव्हा एकवटून येतं, एकाग्र होतं तेव्हा अभेद्य अशा महाशक्तिमान पर्वताच्या पण ठिकऱ्या उडवू शकतं, स्वत:ची अशी एक विलक्षण शक्ती पाणी उभी करू शकतं.
 कोमल पाण्याचं जर असं होत असेल तर आपण का नाही आपली स्वतःची अशी शक्ती,कामं संपन्न करण्याची ताकद उभी करू शकतं?

 जरूर उभी करू शकू,अजोड अशी काम करण्याची ताकद आपण अगदी जरूर उभी करू शकू.फक्त त्याला हवा अभ्यास,हवी मेहनत,हवं सर्व शक्ती एकवटण्याचं विशेष तंत्र,स्वत:च्या गुणांचा अचूक अंदाज आणि हवं अभेद्य खडक फोडण्याचं विलक्षण उद्दिष्ट.हवी शिस्तबद्ध कार्य- पद्धती,कार्य-शैली,हवीं नवनवी आव्हानं अंगावर घेऊन ती पूर्ण करण्याची कौशल्यं-तंत्र,पद्धती आणि शैली.

११९। कार्यशैली