८७. जंगलातली वेगळी वाट
आज सकाळी सकाळीच रॉबर्ट फ्रॉस्टची फार वर्षांपूर्वी वाचलेली एक कविता आठवली.कविता अशी - 'मी एक गोष्ट मन अगदी घट्ट करून तुम्हाला सांगणार आहे'.
फार फार वर्षांपूर्वीची. जंगलातून चाललो असताना एका निर्जन ठिकाणी दोन वाटा फुटल्या, आणि मी...
त्यातली कमी मळलेली वाट घेतली आणि सांगू- त्यानंच सगळं बदलत गेलं. अगदी आतून अन् बाहेरून, सारं सारं.
आयुष्यात चालता चालता कुठे दोन वाटा फुटतील सांगता येत नाही. जास्त मळलेली वाट काही देते आणि काही अव्हेरते. कमी मळलेली वाट अनपेक्षित धक्के देते, थरार देते आणि कमालीचा वेगळा अनुभवही पदरात घालते. एका वळणावर, एखाद्या थांब्यावर सारंच बदलतं. रॉबर्ट फ्रॉस्टनं वेगळी वाट चोखळण्यातली गंमत मांडली आहे.
एक मात्र खरं की अशी वाट मिळविण्यासाठी जंगल मात्र तुडवायला लागतं आणि तुडवण्याआधी ते शोधावंही लागतं.
११७। कार्यशैली