Jump to content

पान:कार्यशैली.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८६.आनंद म्हणजे काय ?



 राहुल, त्याचा मित्र पंकज आणि आणखी त्यांचे दोन-चार मित्र यांना जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा मी काहीतरी संपूर्णपणे नवीन असं ऐकतो.

 आज जरा उशिरा ऑफिसवरून घरी आलो तेव्हा हे सारे मला रस्त्यातच भेटले. कुठल्याशा ब्राझिलीयन कवीचं नाव मला माहीत आहे का असं विचारत होते. मला माहीत नव्हतं पण काय रे कशासाठी असं विचारलं तेव्हा पंकज म्हणाला, “एक म्युझिकल करायचंय त्यासाठी. सध्यातरी सारी मंडळी एखादा बॅण्ड बसवण्याच्या मागे आहेत. मला आठवतं, सुमारे दोन महिन्यांपूर्वी आपले गड-किल्ले साफ करायचं त्या सर्वांनी मनावर घेतलं होतं. त्याच्याही आधी मराठी कविता एकत्र बसून वाचण्याचं त्यांचं चालू होतं. ती सगळी मुलं अतिशय चांगली आहेत. काहीतरी करावं, म्हणून त्यांची सतत धडपड चालू असते. मी त्यांचा दोस्त आहे आणि म्हणून मला त्यांच्या ऊर्मी, आकांक्षा अगदी जवळून माहीत आहेत.

११५। कार्यशैली