पान:कार्यशैली.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८३. खरं काय, खोटं काय?



 कधी कधी वाटतं की आपण सगळेच फार ढोंगी होत चाललो आहोत काय?आपण म्हणजे तुम्ही,आम्ही, मी,सगळेच.

 असं वाटायचं कारण आपण खूप वेळा जे शब्द वापरत असतो ते आणि आपल्याला जे खरोखर म्हणायचं असतं ते यात खूपच अंतर असतं. काही वेळा दुसऱ्याचा उपमर्द होऊ नये म्हणून आपण तसं बोलत असतो किंवा दुसऱ्याला उगाचच चढवून स्वार्थ साधण्यासाठी थापा मारत असतो. कधी कधी तर असं होतं की आपण जे शब्द वापरत असतो त्याचा खरा अर्थ आपल्याला माहीत नसतो. लोक बोलतात म्हणून आपणसुद्धा बोलतो. आपणही त्यांच्यात आहोत हे दाखवावं म्हणून आपण शब्द फेकत राहतो. एक खोटा, दाखवण्यासाठी बनवलेला आविर्भाव, एक धूसर खोटं आवरण,वातावरण आपण सतत बाळगत राहतो, वाढवत ठेवतो आणि मला वाटतं त्यात आपण कधी कधी चक्क गुदमरून जातो आणि मग आपण खरे कसे आहोत अन् आपण दाखवतोय काय हे पाहणं फार आवश्यक ठरतं, फारच.

१११। कार्यशैली