Jump to content

पान:कार्यशैली.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८०. नदीच्या प्रवाहासारखं


 माणूस टेबलापाशी बसला असेल किंवा यंत्रापाशी उभा असेल तर तो काम करतच असतो असं नाही. कदाचित तो काम कसं करावं याचा विचार करत असेल किंवा नियोजन करत असेल.कदाचित तो घरचाही विचार करत असेल किंवा एखादी घरगुती समस्या त्याला डाचत असेल.कदाचित त्याला काहीच करायचं नसेल, विश्रांती घ्यावीशी वाटत असेल किंवा आतून काही करावं अशी ऊर्जा वाटत नसेल.
 माणूस जेव्हा कामाला लागतो त्या वेळेस त्याची शक्ती, त्याचं चित्त आणि त्याचं लक्ष हे कामाकडंच लागेल याची खात्री नसते. मनाच्या आंदोलनामुळं किंवा इतर कुठल्याही कारणांमुळं काम करणारा माणूस कामाला सर्वस्व वाहू शकत नाही आणि मग निराशा पदरी येऊ शकते,आत्मविश्वास पूर्णपणे हरवू शकतो. काय करायचं ते नक्की ठरलेलं हवं.

 स्पष्ट असं.बाहेरच्या कुठल्याही गोष्टी मनात खळबळ माजवणाऱ्या नकोत.पूर्ण विश्रांती अन् सुरेख व्यायाम होऊन शरीर स्वस्थ,अन् मन शांत हवं.घाई नको,की गडबड नको.मनाची स्थिरता, शरीराची तंदुरुस्ती, पूर्ण काम माहीत असलेलं अन् लक्ष नीट पक्कं समोर.बस्स.मग आणखी काय हवं? शांत नदीच्या प्रवाहासारखं पुढं पुढे जात राहणं. एवढंच राहतं शिल्लक.

१०७। कार्यशैली