पान:कार्यशैली.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७९. खंक वातावरण


 वसंतकाकांचा धाकटा मुलगा येणार म्हणून मी लवकर घरी आलो.आमचे काका म्हणजे कॉलेजात अर्थशास्त्राचे प्राध्यापक. खूप हुशार पण तितकेच विक्षिप्त, आत्ममग्न आणि अत्यंत मर्यादित आकांक्षा असलेले,आत्मसंतुष्ट,अल्पसंतुष्ट.
 त्यांचा मुलगा अभिजीत कॉम्प्युटर कोर्ससाठी अॅडमिशन घ्यायला येतो आहे,याचा मला आनंद झालेला. संध्याकाळी अभिजितला पाहिलं आणि आश्चर्यानं पार उडालो. अभिजित म्हणजे काकांची कॉपी होती, कॉपी.खांदे घडलेले,चेहरा उतरलेला, सदा प्रश्नचिन्ह संपूर्ण अंगभर, पूर्ण यथेच्छ निरुत्साह. जड पावलानं खांद्यावर ओझं घेऊन चालल्यासारखं चालणं.अभिजितचं नाही पण काकांच्या गावचे बरेचजण असेच आहेत. निरुत्साही, अल्पसंतुष्ट आणि काहीही करण्याची इच्छा नसणारे खंक.

 या गावातले सगळेच असे कसे? हा प्रश्न मला कायमच सतावणारा.वाटलं, तिथल्या वातावरणातच थंड, ऊर्जा खाणारं ठिकाण असावं, हवेत निरुत्साह असावा. वाटलं,अशा वातावरणातून साखळ्या तोडून बाहेर पडणंच खरं. बाकी सारं खोटं.

कार्यशैली।१०६