पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 "आता मी तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे वळतो. हा प्रश्न अलिगढविषयी आहे. माझे आयुष्य अलिगढला शिकवण्यात गेले. येथील वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांशी माझा निकटचा संबंध आला. अलिगढला मुस्लिम लीगची चळवळ वळली. इथेच पाकिस्तानी विचाराने मूळ धरले. असे का झाले? असा प्रश्न तुमच्या मनात आहे. हा प्रश्न गेली अनेक वर्षे मलाही भेडसावीत आहे."
 "अखेरीला अलिगढ विद्यापीठ कशाकरता निघाले? मुस्लिमांचा मागासलेपणा घालवणे, हे अलिगढ आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट होय; परंतु अलिगढने हे उद्दिष्ट साध्य केले नाही. अलिगढ-आंदोलनाचे हे अपयश हाच पाकिस्तानच्या चळवळीचा पाया ठरला आहे. ज्या प्रकारचा सुशिक्षित-बुद्धिवादी वर्ग अलिगढने निर्माण करायला हवा होता, तसा ते विद्यापीठ करू शकले नाही. याचा परिणाम म्हणजेच अलिगढच्या सुशिक्षित वर्गानेच विभक्तवादी पाकिस्तानी चळवळीचे नेतृत्व केले. अलिगढच्या या अपयशाने मन खिन्न होते."
 ते बोलायचे थांबले. आधी एक तास दिला असूनही ते जवळजवळ दोन तास बोलत होते. मधेच एकदा मला म्हणाले,
 "मुसलमानांना ऐतिहासिक सत्याची काहीच चाड नसते. एकदा मी काही सुशिक्षित मंडळींना सांगितले होते, एके काळी अरबी भाषेत दिव्याला शब्दच नव्हता. 'चिराग' हा शब्द पर्शियनमधून अरबी भाषेत आलेला आहे. याचे कारण, प्रेषिताच्या काळात मदिना शहरातील कोणत्याही घरात दिवा लावला जात नसे. कारण दिवा लावण्याची पद्धतच त्यांना माहीत नव्हती. परंतु, ही वस्तुस्थिती लक्षात न घेता, ‘अरबी भाषा परिपूर्ण आहे,' असाच ही मंडळी माझ्याशी युक्तिवाद करीत होती. ज्या भाषेत दिव्याला शब्द नाही, ती भाषा परिपूर्ण कशी? प्रेषिताच्या वेळी मक्का आणि मदिना या दोन्ही शहरांत मिळून एकूण सत्तावीस साक्षर होते. यामुळे इस्लामच्या परंपरेत तोंडी पुराव्याला महत्त्व आहे. मुसलमान जोपर्यंत धर्म आणि त्याची प्रगती यांच्याकडे ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहत नाहीत, तोपर्यंत ते आहेत तसेच राहणार."
 पुढे ते मला म्हणाले,
"तुम्ही मला भेटायला आलात, म्हणून मी हे सारे बोललो. एरवी मी आता सार्वजनिक जीवनातून निवृत्त झालो आहे. विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविण्यासाठी गळ घातली, म्हणून मी उभा राहिलो. मी निवडणूक हरणार ,हे अपेक्षितच होते. परंतु मला एक मोठे समाधान आहे, मी तर माझ्या मताशी प्रतारणा केली नाही!"
 ते उठून उभे राहिले. मुलाखत संपल्याची ही खूण होती. त्यांचा मी निरोप घेतला. माझा हात हातात घेऊन ते म्हणाले, “मिस्टर दलवाई, तुम्हाला एकच सांगायचे आहे- कधीही, कोणत्याही परिस्थितीत धैर्य सोडू नका! धैर्यच माणसाला अखेर त्याच्या उद्दिष्टाप्रत घेऊन जाते!"


६२ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा