पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/62

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "भारताव्यतिरिक्त इस्लामी जगताचा विचार केला तर, काही देशांत कायदे बदलले आहेत, परंतु तुर्कस्तान वगळता इतर देशांतील बदलांचे स्वरूप मर्यादित आहे. उदाहरणार्थ- बहुपत्नित्व मर्यादित करण्यात आले आहे. गुलामी नष्ट करण्यात आली आहे. याचाच अर्थ, सवलतींना अथवा कायद्यांना ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत, त्या संकुचित करण्यात आल्या आहेत. परंतु शरियतच्या मर्यादांचा भंग करणारे क्रांतिकारक कायदे अद्याप त्यांनी बनवलेले नाहीत."
 "आता तुमच्या प्रश्नाकडे वळतो. भारतीय (मुस्लिमांचा) कायदा आता कालबाह्य झाला आहे. त्याच्यात क्रांतिकारक बदल केले पाहिजेत."
 मी मधेच विचारले, “वेगवेगळ्या जाती-धर्मांचे कायदे बदलण्यापेक्षा सर्वांसाठी एकच कायदा करावा, असे आपल्याला वाटते का?"
 "बिलकुल हरकत नाही. कायदा बदलणे, ही बाब माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे."
 “मी आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळतो. भारतीय मुस्लिमांचा प्रश्न-ज्याला हिंदू-मुस्लिम प्रश्न म्हणतात- इतिहासातून निर्माण झालेला आहे, याला एका मर्यादेत अर्थ आहे. एक तर मुस्लिम राजवटींचा इतिहास हा आपला इतिहास असे मुसलमान मानतात; आणि तो परकी, आक्रमक विजेत्यांचा इतिहास आहे असे हिंदु मानतात. इतिहास संघर्षमय असला तरी त्या गतेतिहासात आता रममाण व्हायचे नाही, हे अजून आपल्याला शिकायचे आहे."
  "मुसलमानांपुरते बोलायचे तर इतिहासाला भूगोलाची एक बाजू असते, हे त्यांनी कधी समजावूनच घेतले नाही. मुस्लिमांना भूगोलाची जाणीवच नसते. तुम्हाला याचे एक उदाहरण देतो. माझा नोकर मला १९४६च्या निवडणुकीत 'कुणाला मत देऊ?' असे विचारायला आला. कारण मी काँग्रेस पक्षातर्फे मध्यवर्ती कायदे मंडळाच्या निवडणुकीकरता उभा होतो. तेव्हा मतदारसंघ वेगळे आणि मर्यादित होते. निवडणुकीत माझा पराभव झाला आणि लीगवाला प्रचंड बहुमताने निवडून आला. पण ही बाब महत्त्वाची नाही. पुढे फाळणी झाल्यावर याच नोकराने मला विचारले, 'हबीबसाब, हमने वोट तो यहाँ दिया, लेकिन वो कराची में कैसा निकलके आया?'"
 “परंतु या प्रश्नाला धार्मिक बाजूदेखील आहे. इस्लाम आणि रोमन कॅथॉलिक धर्मात सुधारणा होणे मुश्किलीचे आहे. या धर्मांत आधुनिक प्रवाह फार दुबळे आहेत. रोमन कॅथॉलिक बहुसंख्य असलेला फ्रान्स आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला तुर्कस्तान वगळले, तर इतर मुस्लिम आणि कॅथॉलिक देश जगातील मागासलेले प्रदेश म्हणूनच ओळखले जातात. या दोन धर्मगटांत आधुनिक विचार रुजणे आवश्यक आहे. मुसलमानांच्या दृष्टीने तर ते अतिशय आवश्यक आहे."

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ६१