पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मला भेटलेली ही सारीच मंडळी अगतिक झाल्याप्रमाणे बोलत असल्याचे पाहून आश्चर्य वाटते. बहुधा अलिगढला अधिक सामर्थ्यवान असलेल्या जातीयवादी शक्तीशी मुकाबला करणे अशक्य होत असल्याचा परिणाम असावा!
 सौ. किशनसिंगनीच माझी प्रा. महंमद हबीब यांच्याशी उद्याची वेळ ठरवून दिली. ते इतिहासाचे प्राध्यापक. सध्या नॅशनल प्रोफेसर आहेत. हिस्टरी काँग्रेसचे दोनदा तरी अध्यक्ष होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उपराष्ट्रपतिपदाकरता विरोधी पक्षातर्फे उमेदवार होते. त्यांना भेटण्याची मला उत्सुकता होतीच.
 ते बरेच थकलेले दिसले. संथपणे म्हणाले, “तुम्ही उद्या सकाळी दहा वाजता या. मी तुम्हाला फक्त एक तास देईन. तुमचे प्रश्न तुम्ही तयार करून आणा. निष्कारण बाष्कळ बोलण्यात मी वेळ दवडणार नाही. आणि केवळ तीनच प्रश्न विचारा!"

६ सप्टेंबर १९६७

 प्रा. हबीब वाटच बघत होते. ते व्हरांड्यांत खुर्चीवर बसले होते. दुसऱ्या रिकाम्या खुर्चीवर त्यांनी मला बसण्याची खूण केली. मग ते उठून आत गेले व हातात खूपसे चिरूट घेऊन बाहेर आले. नोकराने तेवढ्यात चहाचा ट्रे आणला. हबीब मला म्हणाले, “या किटलीतील चहा संपेपर्यंत आपण बोलत राहू. चिरूट ओढता ना?" त्यांनी चहा बनवला. मग म्हणाले, "विचारा काय विचारायचे ते!"
 मी तीन प्रश्न एका कागदावर लिहून घेऊन गेलो होतो. ते त्यांना वाचून दाखवले.
 पहिला प्रश्न : अलिगढ विद्यापीठाने मुस्लिम समाजात आधुनिक धर्मनिरपेक्ष विचार आणण्यात कितपत हातभार लावला?
 दुसरा प्रश्न : भारतातील हिंदू-मुस्लिम प्रश्नामागे भारतीय गतेतिहास कितपत कारणीभूत आहे?
 आणि तिसरा प्रश्न : भारतीय मुसलमानांत सामाजिक सुधारणा होणे आवश्यक आहे, असे आपल्याला वाटते काय?
 त्यांनी माझा कागद हातात घेऊन ते प्रश्न पुन्हा नीट वाचून घेतले आणि मग ते बोलू लागले,
 “तुमच्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर आधी देतो- किंबहुना, मी शेवटाकडून आरंभ करणार आहे. सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत,असे मी नेहमीच मानीत आलो आहे. मुस्लिम सामाजिक कायदे बदलले पाहिजेत, असे माझे मत आहे.


६० । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा