पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

"माझे नातेवाईक पाकिस्तानात आहेत. ते अधूनमधून इथे येत असतात. माझे इतर नातेवाईक अधूनमधून पाकिस्तानात जात असतात. त्यांच्यामुळे तिथे काय चालले आहे, हे मला कळते. तेथील नवी पिढी अधिक धर्मांध, अधिक जातीयवादी होत आहे. पाकिस्तानी राज्यकर्ते या तरुण पिढीला पद्धतशीरपणे तशी बनवत आहेत. हा झगडा मग लवकर मिटावा कसा?"
 प्रा. निझामी आणि प्रा. जमाल ख्वाजा हे आणखी दोन प्राध्यापक भेटले. निझामींचे काही लिखाण मी वाचलेले आहे. त्यांचा शहा वलीउल्ला (भारतातील पुनरुत्थानवादी मुस्लिम चळवळींचा जनक.) वरील लेख गाजला होता. ते बरेच रिझर्व्हड वाटले. परंतु मजलिसे मशावरतच्या राजकारणावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, “आता मुस्लिमांच्या वेगळ्या राजकीय संघटना असू नयेत, असे माझे मत आहे."
 श्री. जमाल ख्वाजांनी येण्याचा हेतू विचारला.
 मी कल्पना देताच, त्यांनी गंभीर चेहरा केला. ते घराच्या छताकडे पाहत राहिले. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असल्याचे मला माहीत होते. त्यांच्याविषयी थोडेसे नानासाहेब गोऱ्यांच्या तोंडून ऐकले होते. नानासाहेब लोकसभेचे सभासद होते. श्री. ख्वाजा राज्यसभेचे नियुक्त सभासद होते आणि एकमेकांच्या शेजारी राहत होते.
 श्री. ख्वाजा छताकडे पाहतच मला म्हणाले, “मिस्टर दलवाई, मुसलमान समाजात मार्टिन ल्युथर का निर्माण होत नाही याचा मी विचार करतो आहे! प्रोटेस्टंट पंथासारखा पंथ निघाल्याखेरीज इस्लामचे आजचे रूप बदलू शकणार नाही!"
 मागाहून मुशीरने मला सांगितले, “जमाल ख्वाजांचे वडील आणि जवाहरलाल नेहरू यांचे फार निकटचे संबंध होते. नेहरू अलिगढला आले की, प्रथम त्यांच्या घरी जात. ख्वाजांच्या एका भावाचे नाव वडिलांनी म्हणूनच जवाहर ठेवले आहे, दुसऱ्या भावाचे नाव रवींद्र. ते रवींद्रनाथ ठाकूरांविषयीचा आदर म्हणून ठेवलेले!"
 किशनसिंगची पत्नी संध्याकाळी भेटली. किशनसिंगने घरी नेले. पत्नीची ओळख करून दिली आणि तो पुन्हा दुकानात परतला. सौ. किशनसिंग म्हणाल्या, “माझा एक लेख 'माधुरी' या हिंदी मासिकात प्रसिद्ध झाला होता. त्यावर मला मुसलमानांची शिवीगाळ करणारी असंख्य पत्रे आली. ती वाचून, यापुढे आपण काही करू शकणार नाही, याविषयी माझी खात्री पटली!"

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ५९