पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मी थोडक्यात त्यांना काय पाहिले, याची कल्पना दिली. मग प्रश्न विचारला, “बिगरमुसलमानाला या मदरशात शिकायला प्रवेश मिळू शकेल?"
 “नाही. हिंदू धर्मपीठांत अहिंदूला प्रवेश मिळत नाही. ख्रिश्चन सेमिनरीमध्ये इतरांना प्रवेश मिळत नाही. तसाच इथे बिगरमुसलमानांना मिळणार नाही."
 "स्त्रियांना? मुस्लिम स्त्रियांना इथे धर्म शिकता येतो?"
 "नाही, कारण स्त्रिया मौलवी बनत नाहीत."
 "बनू शकतील."
 "आम्हाला बनवायच्या नाहीत."
 मागाहून मला कळले की, स्त्रियांना या मदरशाच्या आवारातदेखील प्रवेश करता येत नाही.
 मग मी जरा धीर करून विचारले, “आपण नेहरूंच्या मृत्यूनंतर एक फतवा काढला होतात. दि. २० जून १९६४च्या 'दावत'च्या अंकात तो प्रसिद्ध झाला आहे. त्याच्यावर बरीच उलट-सुलट चर्चा झाली आहे. आपल्याला त्याविषयी आज काय वाटते?"
 "माझे ते मत कायम आहे. मी योग्य तेच म्हटले आहे. तुम्ही धर्मशास्त्र वाचले आहे?"
 "नाही."
 "इस्लामविषयी काही वाचले आहे?"
 “फारसे नाही."
 "मग आपण वाद कसा घालता?"
 "माझा मुद्दा वेगळाच आहे. धर्मविषयक मूल्ये बदलतात की नाही, असा माझा प्रश्न आहे. उदाहरणार्थ- ख्रिश्चन चर्चमध्ये नेहरूंच्या मृत्यूनंतर प्रार्थना झाल्या. त्यांच्या धर्मश्रद्धेला कुठे बाधा आलेली नाही."
 “म्हणूनच तुम्ही इस्लाम समजावून घेतला पाहिजे. हिंदुस्थानात केवळ नावाचे मुसलमान राहणार की इस्लामदेखील राहणार, असा प्रश्न आहे. पूर्वीदेखील तोच प्रश्न होता; आजही तोच अस्तित्वात आहे. अकबर आणि औरंगजेब यांच्यातील फरक हाच आहे. मुसलमान अकबराच्या मागे लागले असते तर मुसलमानांचा धर्म राहिलाच नसता, ते नावाचे मुसलमान राहिले असते. औरंगजेबामुळे धर्मही राहिला, मुसलमानदेखील राहिले! हा झगडा चालूच आहे, आणि चालूच राहणार!"
 त्यांनी विचारले, “आणखी विचारायचे आहे?"
 मी 'नाही' म्हटले. त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर काही विचारण्यासारखे उरलेच नव्हते.


कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ५७
 

.