पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे, असे मला प्रथम वाटले नाही. त्यांनाही पीरियडला जायचे होते. निघताना ते म्हणाले,
 “तुम्ही उद्या याच वेळेला येथे येऊ शकाल का? माझी पत्नी येणार आहे. तुम्ही तिला भेटावे, असे मला वाटते. ती मुसलमान आहे आणि आमच्या लग्नामुळे आम्हालाही एका वेगळ्या पातळीवर या प्रश्नाला तोंड द्यावे लागले आहे."
 दासने मला गुप्तांकडे का आणले, ते आता कळले.

 १४ ऑगस्ट १९६७,
 आज खतिजा गुप्ताला जाऊन भेटलो. श्री. गुप्तादेखील होते. आमची ओळख करून दिल्यानंतर ते पीरियडला निघून गेले. खतिजाने विचारले, “आता बोला."
 काय बोलावे, असा मला प्रश्न पडला. मी म्हणालो,
 "तुम्हीच सांगा. स्वत:विषयी, तुमची हरकत नसेल तर तुमच्या लग्नाच्या अनुभवाविषयी."
 त्या म्हणाल्या,
 "मी लखनौची. फिरंगी महल मदरसाचे नाव तुम्ही ऐकले आहे?"
 "वा! निश्चितच. मला वाटते, हा मदरसा औरंजेबाने सुरू केला. या वाड्यात पूर्वी युरोपियन्स राहत होते, म्हणून त्याला फिरंगी महल म्हणतात."
 "बरोबर. आमचे नाव अन्सारी. लखनौचे अन्सारी हे एक प्रतिष्ठित घराणे आहे. माझे वडील फिरंगी महल मदरशाचे मौलवी होते. सध्या ते ढाक्याला असतात. 'कौमी आवाज' या लखनौच्या उर्दू पत्राचे संपादक हयातुल्ला अन्सारी हे आमच्याचपैकी एक. एरवी ही मंडळी नेहरूंच्या भोवताली वावरायची. नेहरूंच्या धर्मनिरपेक्षतेची स्तुती करायची. परंतु आमच्या लग्नाला त्यांनीदेखील विरोध केला. धर्म विसरणे हे तितकेसे सोपे नाही, हे तेव्हा माझ्या लक्षात आले. तर... मी तुम्हाला लग्नाविषयी सांगत होते. माझ्या सर्वच नातेवाइकांनी लग्नाला विरोध केला. अपवाद माझ्या वडिलांचा. त्यांनी पाठिंबा दिला.

 “आम्ही नोंदणी पद्धतीने विवाह केला. एक-दोन दिवस फारसे काही घडले नाही. आणि मग सबंध लखनौ शहरात वातावरण तंग बनले. जातीय दंगा होण्याची भीती वाटू लागली. गंमत अशी की, या काळात अनेक जनसंघवाले आमच्या मदतीला धावून आले. काही दिवसांनी वातावरण निवळले. तेव्हा त्यांनी मला हिंदू करून घेण्याविषयी अनिरुद्धला सुचविले आणि अनिरुद्धने नकार देताच तेही आमचे विरोधक बनले. खरे म्हणजे, आम्ही दोघेही धर्म मानत नव्हतो.

४२ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा