पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/30

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घेण्याचा प्रयत्नही करत राहणार. मुस्लिम लोकसंख्या वाढवण्याचा एक पद्धतशीर प्रयत्न अस्तित्वात असावा, असे मानावयास आधार आहे. अलिगढ विश्वविद्यालयाच्या एका प्राध्यापकाने माझ्याशी बोलताना क्युबेकमधील वाढलेल्या फ्रेंच लोकसंख्येचे उदाहरण देऊन भारतातील 'मुसलमानांनाही क्युबेकमधील फ्रेंचांप्रमाणे आपल्याला भारतात आणखी एक स्वतंत्र भूमी निर्माण करता येईल' हे काढलेले उद्गार मुस्लिम मनोवृत्तीचे यथार्थ दर्शन घडवतात. (क्युबेकमध्ये फ्रेंच कॅथॉलिक आहेत. इंग्रजी कॅनेडियन प्रोटेस्टंट असल्यामुळे ते कुटुंबनियोजन करतात. कॅथॉलिकांनी कुटुंबनियोजन न केल्यामुळे गेल्या ७५ वर्षांत त्यांनी आपली लोकसंख्या वाढवली, असे या प्राध्यापक महाशयांना सांगायचे होते.) वरील विवेचनावरून आपल्यापुढील प्रश्नांची कल्पना यावयास हरकत नाही. प्रथम आपल्याला पाकिस्तानच्या बाबतीत खंबीर धोरण स्वीकारावे लागेल. खंबीर धोरण ठेवणे याचा अर्थ, पाकिस्तानच्या सहकार्याच्या कृतीला प्रतिसाद न देणे असा मात्र नव्हे. जिथे जिथे सहकार्याचा प्रसंग येईल तिथे सहकार्य करणे; त्याचबरोबर पाकिस्तानला काश्मीरसकट कोणत्याही सीमेवर खंबीरपणे रोखून धरणे, असे धोरण आपल्याला दीर्घ काळ आखावे लागेल. कारण भारत-पाक संघर्ष नजीकच्या भविष्यकाळात संपणार असल्याची भोळसट अपेक्षा बाळगून कोणतेही पाऊल टाकणे चूक ठरेल. आपल्याला निदान ५०/७५ वर्षे या युद्धाला तोंड द्यावे लागणार आहे, ही खूणगाठ मनाशी बाळूगन वागावे लागणार आहे.
 या बाबतीत आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाने काही ढोबळ चुका केल्या आहेत, त्या आपण आता टाळल्या पाहिजेत. गांधींजींचे धोरण पाकिस्तानशी व येथील मुसलमानांशी मृदुपणाचे आणि म्हणून चूक होते. नेहरूंचे धोरण पाकिस्तानशी अधिक वास्तववादी, परंतु येथील मुसलमानांशी मृदू आणि म्हणून चूक होते. वल्लभभाईंचे धोरण हे पाकिस्तान आणि येथील मुसलमानांशी खंबीरपणे वागण्याचे होते. त्यातील उणीव एवढीच होती की, पाकिस्तान आणि येथील जातीयवादी मुस्लिम नेतृत्व यांच्याशी खंबीर वागताना मुस्लिम उदारमतवादी व्यक्तींना (मृदू वागून) अधिक वाव देण्याचे धोरण वल्लभभाईंना अजमावता आले नाही.

 आपल्या देशातील कम्युनिस्टांनी व समाजवाद्यांनी आलटून-पालटून गांधीजी व नेहरू यांचे चुकीचे धोरणच पुढे चालवले आहे आणि हिंद जातीयवाद्यांनी वल्लभभाईंच्या धोरणाला आपला आदर्श मानले आहे. ही दोन्ही आत्यंतिक टोके टाळून वास्तववादी धोरण आपल्या देशातील धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या पक्षांनी आता अवलंबिण्याची वेळ आली आहे. या बाबतीत जनसंघाच्या एका गटाचे उदाहरण देणे अस्थानी ठरणार नाही. काश्मीरमधील पंडित मुलीच्या आंतरधर्मीय लग्नाच्या निमित्ताने झालेल्या आंदोलनाच्या वेळी जनसंघाचे

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । २९