पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/29

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 येथील मुस्लिम जातीयवादी शक्तीच्या सामर्थ्याचा चढ-उतार हा पाकिस्तानच्या राजवटीच्या स्थिरतेच्या चढ-उतारावर आधारलेला राहिला आहे, हे चाणाक्ष राजकीय निरीक्षकांच्या लक्षात आल्याखेरीज राहणार नाही. पाकिस्तानातील एके काळच्या राजकीय अस्थैर्याने येथील मुस्लिम जातीयवादी राजकारण मंदावलेले होते, परंतु तिथे काही राजकीय बदल झाले. अयूबखानांनी पाकिस्तानला राजकीय स्थैर्य मिळवून दिले. आर्थिक प्रगतीची वाटचाल सुरू केली. लष्करी सामर्थ्य भराभर वाढवायला सुरुवात केली. पाकिस्तान आता भारताशी मुकाबला करावयास सिद्ध झाला आहे, हे हेरलेल्या येथील मुस्लिम राजकीय नेत्यांनी मुस्लिम संघटना उभारण्यास जोरदार आरंभ केला. पाकिस्तानला युद्धात अपयश पदरात पडल्यामुळे येथील मुस्लिम जातीय वृत्ती-मनोवृत्तीच्या तेजोभंग झाला आणि म्हणून या नेतृत्वाने आपला मोहरा बदलला. भारतातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा त्याने गैरफायदा घेण्याचे ठरवले. मुशावरतची स्थापना आणि मुस्लिम मतांच्या आधारे हिंदूंशी सौदा करण्याचा मुशावरतचा प्रयत्न, हा त्याचाच भाग होता. मुस्लिम मतांच्या आणि संख्येच्या आधारे या देशातील राजकारणाला आपण हवे ते वळण लावू, अशी ईर्षा या नेतृत्वाने बाळगली होती. परंतु उत्तर प्रदेशात सत्ता बदलूनही उर्दूला मान्यता मिळू शकली नाही. सौदा करण्याच्या धोरणाची परिणती रांचीच्या दंगलीत झाली. यामुळे मुस्लिम नेतृत्व आता गोंधळलेल्या मनःस्थितीत आहे. तथापि, आपले काय चुकते आहे याचा विचार करावयाच्या मन:स्थितीत ते अजूनही नाही.
 पाकिस्तानला पाठिंबा देण्याची चळवळ आपण केल्याचा हा परिणाम आहे, हे प्रामाणिकपणे मान्य करणारा क्वचितच कोणी मुस्लिम भेटतो. आमची चळवळ योग्य होती, स्वयंनिर्णयाचा (पाक) मुसलमानांना अधिकार होता; अखंड भारतात मुसलमानांची याहूनही अधिक दुर्दशा झाली असती. हिंदूंच्या जाचातून बिचारे पाक मुसलमान तरी सुटले. पाकिस्तानला पाठिंबा मिळाल्यामुळे आम्ही आमचे हक्क गमावलेले नाहीत. हिंदूंशी लढून (मुकाबला करके) आम्ही ते मिळवू, अशी आणि अशा प्रकारची विधाने दहांतील नऊ मुसलमान करताना मला माझ्या उत्तर भारताच्या दौऱ्यात आढळून आले. भारतीय मुसलमानांच्या मन:स्थितीची यावरून आपल्याला कल्पना यायला हरकत नाही.

 थोडक्यात, येथील मुसलमानी राजकारणाचे यापुढील धोरण अंतर्गत आणि बाह्य परिस्थितीनुसार ठरत जाणार आहे. एकीकडे येथील मुस्लिम जातीयवादी नेते पाकिस्तान व मुस्लिम देशांच्या इस्लामी करारातून निर्माण होणाऱ्या (किंवा होण्याची शक्यता असलेल्या) सामर्थ्यातून भारतावर दडपण येण्याची अपेक्षा बाळगतील आणि त्याचबरोबर भारतातील राजकीय अस्थिरतेचा गैरफायदा

२८ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा