पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/27

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अंतरंग समजावून घेण्यासाठी ही ऐतिहासिक आणि भौगोलिक वस्तुस्थिती आपण विचारात घेणे अगत्याचे आहे. भारतात राहणाऱ्या मुसलमानांनी पाकिस्तानच्या मागणीला का पाठिंबा दिला? पाकिस्तान हे त्यांच्या इस्लामिक राष्ट्रविषयक आकांक्षेचे प्रतीक बनले म्हणून! कारण इस्लाम हे एक राष्ट्र आहे, ही भावना भारतीय मुसलमानांच्या मनात सखोल रुजून बसली होती. खिलाफत चळवळीच्या रूपाने तिचा एकदा उद्रेक झाला. त्या आकांक्षांची परिणती पाकिस्तानच्या निर्मितीत झाली.
 परंतु ही भावनात्मक अथवा मानसिक पार्श्वभूमी झाली. व्यावहारिक दृष्ट्या येथे राहणाऱ्या मुसलमानांनी पाकिस्ताननिर्मितीचे पुरोगामी परिणाम का ध्यानात घेतले नाहीत; सुशिक्षित मुसलमानांनीदेखील याचा का विचार केला नाही, असा एक प्रश्न नेहमी माझ्या मनात येतो. या प्रश्नाचे उत्तरही मी सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मते, मुस्लिम लीगच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतातील अल्पसंख्याक ओलीस धरण्याचा जो सिद्धान्त होता, त्याचा सुशिक्षित मुसलमानांच्या मनावर जबरदस्त दबाव होता, हे एक कारण. सुशिक्षित मुसलमान हा एका दृष्टीने मध्ययुगीन ओलीस ठेवण्याच्या कल्पनेतच अडकून पडला होता. त्याच्यावर आधुनिकतेचे संस्कार खऱ्या अर्थाने झालेलेच नव्हते. (अद्यापही झालेले नाहीत.) दुसरे कारण- भारत झट्कन् एकवटला जाईल, असे येथील मुसलमानांना वाटत नव्हते. सुशिक्षित मुसलमानांनादेखील वाटत नव्हते. हैदराबाद स्वतंत्र होईल, संस्थाने स्वातंत्र्य पुकारतील आणि अशा परिस्थितीत दुबळा भारत व पर्यायाने विस्कळीत हिंदू पाकिस्तानशी स्पर्धा करू शकणार नाहीत, असा सुशिक्षित मुसलमानांचा कयास होता!
 अशा या दुबळ्या भारताचे लचके तोडणे पाकिस्तानला सहज शक्य होईल, पाकिस्तानचा विस्तार होत राहील; निदान अर्धा भारत तरी पाकिस्तानच्या ताब्यात जाईल, अशी सुखस्वप्ने उत्तरेकडील सुशिक्षित मुसलमान बाळगत होते! आणि दंगलीचा प्रतिकार हिंदू करणार नाहीत, असेही त्यांना वाटत होते. हिंदू प्रतिकार दुबळा ठरेल, हाही त्यांचा अंदाज होता. हिंदू दुबळा असल्याचे चित्र त्यांच्या मनात मुस्लिम राजवटीच्या दीर्घ काळच्या इतिहासातून निर्माण झाले होते. हिंदूअध:पतनाचा काळ संपत आला असल्याचे या सुशिक्षित मुसलमानाला कधी जाणवलेच नाही!

 भारतातील सुशिक्षित मुसलमानांनी पाकिस्तानच्या निर्मितीचे परिणाम कधी लक्षात घेतले नाहीत, याची ही काही महत्त्वाची आणि कठोर सत्य कारणे आहेत. मुस्लिम सुशिक्षित समाजाचा विचार करण्याचे कारण एवढेच की, कोणत्याही अशिक्षित समाजाला आपण चुकीच्या चळवळीबद्दल दोष देण्यात अर्थ नाही.

२६ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा