पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/22

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाळगतात. तिच्यात 'माल' टाकून ते क्षणार्धात नाहीसे होतात.
 पाकिस्तानच्या निर्मितीनंतर सावकारी करणारे पठाण मुंबईतून काही काळ अदृश्य झाले होते; परंतु कालांतराने ते पुन्हा उगवले आणि आता मुंबईतील नाक्या-नाक्यावर त्यांचे अस्तित्व जाणवू लागले आहे. पठाणांकडून कर्ज घेणाऱ्या लोकांत या पठाणी सावकारीला ‘पठाण बँक' असे विनोदाने संबोधले जाते. हे सारेच पठाण पुश्तु नाहीत. त्यांच्यात अफगाण पठाणांचाही प्रचंड भरणा आहे. शिवडीसारख्या ठिकाणी त्यांनी आपला अड्डा बनवला आहे. ते नमाज पढणे, रोजा पाळणे इत्यादी इस्लामी तत्त्वे काटेकोरपणे पाळतात; परंतु त्याचबरोबर निषिद्ध मानल्या गेलेल्या व्याजाच्या धंद्यावरच आपली उपजीविका करत असतात. अशा प्रकारचे धंदा करणारे सुमारे पाच हजार परदेशी पठाण मुंबईत विखुरलेले आहेत आणि त्यातील निम्मे-अधिक गुप्तपणे किंवा बेकायदा इथे राहिलेले आहेत.
 मुसलमानांची वस्ती मुंबईत सर्वत्र विखुरली गेली आहे; त्याप्रमाणे मुसलमानांचे एकमुखी सामाजिक, राजकीय आणि धार्मिक जीवन भंग पावले आहे. पूर्वी 'झटका' पद्धतीने बकरे मारावे की नाही, यावर (मुसलमानांत) वाद उद्भवत नसे. मुसलमान त्या प्रकाराविरुद्ध एकवटलेले आढळत, परंतु आता त्यावर वाद होतो. द्विभार्या-प्रतिबंधक कायदा, बुरख्याची पद्धत या बाबतीत आपसांत कडाक्याची चर्चा होते. पाकिस्तानी प्रवृत्तीचे समर्थक आणि विरोधक कडाक्याने राजकीय चर्चा करतात; इतकेच नव्हे, तर इस्लामच्या धार्मिक दृष्टिकोनातून त्या प्रवृत्तींचे पृथक्करण करू पाहतात. दाऊदी बोहऱ्यांच्या बड्या मुल्लांविरुद्ध प्रागतिक मंडळासारखी संस्था या मुंबईतच चळवळ उभारते.
 अशा या मतामतांच्या गलबल्यातच राष्ट्रीय चळवळीत सारे जीवन घालवलेली आणि म्हणून मुस्लिम सामाजिक जगतापासून अलग पडलेली हॅरिस, फकी यांच्यासारखी माणसे एखाद्या अफाट महासागरात जेमतेम तग धरून राहिलेल्या इवल्याशा बेटाप्रमाणे वावरत असतात. इस्लामच्या पुनरुत्थानाच्या कार्याशी त्यांनी केलेला 'द्रोह' मुसलमान समाज अद्यापही विसरलेला नाही.
 शौकतुल्ला नावाचा उत्तर प्रदेशाचा एक वृद्ध मला नेहमी भेटत असतो. हाही या राष्ट्रीय परंपरेतील माणसांच्या मालिकेतला. आता तो थकला आहे. काही वेळ झाल्यानंतर दम घेण्यासाठी तो रस्त्यातच थांबतो. गांधीजींच्या असहकारितेच्या चळवळीत त्याने उडी ठोकली, तेव्हापासून मांसाहार वर्ज्य केला. या साऱ्या गडबडीत त्याला लग्न करायचीही शुद्ध राहिली नाही! मुसलमान समाजापासून बहिष्कृत झालेला हा माणूस एखाद्या प्रचंड प्रवाहात धारेला लागल्याप्रमाणे कुठे तरी वाहत राहिला...

 परंतु आता जराजर्जर झाला असला, तरी घालवलेल्या आयुष्याबद्दल त्याला कधी खेद वाटत असलेला मला दिसून आलेला नाही.

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । २१