पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/21

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोर्चाचे रसभरीत वर्णन वाचण्यासाठी मग कधी कधी ते 'मराठा'सारखे मराठी वृत्तपत्र वाचताना (किंवा वाचून घेताना) आढळतात! उत्तर प्रदेशच्या समाजजीवनातील सारे स्तर या विभागात एकवटले गेले आहेत. त्यांत चर्मकार आहेत, न्हावी आहेत, धोबी आहेत आणि मागावर काम करणारे व कबीराचा वारसा सांगणारे अन्सारही आहेत! मात्र आपल्या या वस्तीत इतरांना (मुसलमानांनाही) ते टिकू देत नाहीत. मदनपुऱ्याला भेंडी बाजार लागून असला तरी त्याच्या या स्वभावाशी तो अजून जुळते घेत नाही. झूला मैदान आणि केसरबाग हे इवलेसे अंतर पार केले की, लागलीच हा बदल जाणवतो. मग 'डॉन', 'अन्जाम'सारखी पाकिस्तानी वृत्तपत्रे भेंडी बाजारच्या नाक्यावरील वृत्तपत्र एजंटकडे लटकलेली आपल्याला दिसून येतात.
 गुमास्ता या विभागात कायदा अस्तित्वात नाही. इथली सलूने, हॉटेले आणि इतर दुकाने रात्री उशिरापर्यंत उघडी असतात. त्यांची सजावट वेगळी, भडक असते. येथील हॉटेले असंख्य आरश्यांनी व ट्यूबलाईटच्या दिव्यांनी रात्रीची झगमगून गेलेली असतात आणि दिवसभर चित्रपट-संगीत कर्णकर्कशपणे आपल्या कानांवर आदळत असते. इराणी हॉटेलवाला या विभागात अभावानेच दिसून येतो. कारण सकाळचा नुसता चहा-पाव खाऊन मुसलमानांचे कधी समाधान होत नाही. त्याला भरपूर नाश्ता हवा असतो म्हणून की काय, येथे चिलियांची हॉटेले आढळतात आणि त्या हॉटेलांमधून मोगलाई पद्धतीचे जेवण सर्रास मिळते. शीग हा भाजलेल्या गोमांसाच प्रकार याच विभागात रस्त्यांवर विक्रीकरता सर्रास ठेवलेला असतो.

 हॉटेलमधून गोमांस सर्रास विकले जाते आणि घराघरांतून गोमांसाची विक्री करणारे लोक याच विभागात वावरत असतात. 'बडेका गोश सस्ता मिलता है' हे उत्तर तुम्ही थोडीशी चौकशी केल्यानंतर तुम्हाला देण्यात येते. गाई-म्हशींची बेकायदा कत्तल करून त्यांचे मांस विकणाऱ्या टोळ्या याच भेंडी बाजार-मदनपुरा विभागांत अस्तित्वात आहेत. हिंदूंच्या भावना दुखवाव्यात, म्हणून ते हा धंदा करीत नाहीत. एखाद्या ख्रिश्चनाने जितक्या सहजपणे हातभट्टीचा व्यवसाय करावा तितक्या सहजपणे त्यांनी हा व्यवसाय उचलला आहे आणि बोरिवली, घाटकोपरपासून कुलाब्यापर्यंत कुठेही त्यांनी आपल्या कार्याचा पसारा व्यापला आहे. अत्यंत कठोरतेने ते आपला उद्योग पार पाडतात. भटकणारी गुरे हे त्यांचे भक्ष्य. त्यांची 'मोडस ऑपरेंडी' वाखाणण्यासारखी असते. दहा मिनिटांत ते एका गाईचा (अथवा म्हशीचा) सोक्षमोक्ष लावतात. शस्त्रक्रिया करणाऱ्या शस्त्रवैद्यालाही हेवा वाटावा एवढ्या कुशलतेने गुरे फाडतात, मांस अलग करतात आणि उरलेला भाग फेकून देतात. आपल्या बरोबर बहुधा जीपसारखे एखादे वाहन

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । २०