पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/19

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वेगळेपणा गमावून बसले आहेत! त्यांनी स्वत:ची मराठी भाषा सोडून उर्दू आत्मसात केली आहे. उत्तर प्रदेशच्या मुसलमानांचे आचार-विचार, राहणी त्यांनी स्वीकारली आहे. मराठी मुलुखांतील कुणी मुसलमान भेटला, तरी ते त्याच्याशी शक्यतो मराठीतून बोलायचे टाळतात आणि माझ्यासारख्या एखाद्याने मराठीतून बोलायचा आग्रह धरलाच तर, 'अरे भाई, मियाँभाई मिलते है तब आपस में उर्दूमें ही बात करते हैं।' असे सांगून गप्प करण्याचा प्रयत्न करतात. गुजराती मियाँभाई मात्र त्यांच्याशी उर्दूतूनच बोलतो. त्यांच्या घरात गुजराती बोलली जाते, याचाही त्यांना सोइस्कर विसर पडलेला आहे.
 हा प्रांतीय अथवा जमातीचा अलगपणा मुसलमान समाजात अद्यापही कायम राहिला आहे. खोजा, मेमन, बोहरी यांच्या मशिदीही वेगळ्या बांधलेल्या आहेत. (बोहऱ्यांच्या मशिदीत दुसरा कुणी नमाज पढत नाही आणि बोहरी दुसऱ्याच्या मशिदीत नमाजेला येणार नाही.) पूर्वीच्या 'इस्लामी' जगताचे प्रतिनिधी म्हणून क्रॉफर्ड मार्केटजवळील सुप्रसिद्ध जुम्मा मशिदीची, माहिमच्या मशिदीची व्यवस्था कोकणी मुसलमानांकडे राहिलेली आहे. ईदच्या दिवशी ते त्या मशिदीकडे नमाजेला वळतात. कारण त्यांच्या मजहबप्रमाणे (शाफी, हनफी इत्यादी) तेथे नमाज पढली जाते.
 खोजा, मेमन आणि बोहरी या धंदेवाईक जमातींनी मुंबईच्या व्यापारी जगतात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यातील खोजा व्यापाऱ्यांनी दाणाबंदरच्या धान्याच्या व्यापारात आपला जम बसवला आहे; तर बोहऱ्यांनी कागद, ग्लास इत्यादी उद्योगांत एक प्रकारची मक्तेदारी प्रस्थापित केली आहे. फाळणीनंतर आलेल्या सिंधी जमातीने सर्वच प्रकारच्या व्यापारांत आपले बस्तान बसवले, त्याचा परिणाम या जमातीवर झाला आहे. प्रचंड भांडवली उद्योगधंद्यांचे एक नवे क्षेत्रच मुंबईत विकसित होऊ लागल्याने व्यापारातही आता मुसलमान मागे पडत चालला आहे, अशा प्रकारची तक्रार या जमातीकडूनच करण्यात येते. यातील बोहरी जमात राहणीने आणि आचाराने इतरांहून भिन्न तर आहेच, परंतु आपला अलगपणा कायम ठेवण्यसाठी ती सतत धडपडत असते. त्यांच्या स्त्रियांचा वेगळ्या पद्धतीचा बुरखा ही त्या अलगपणाची एक ढळढळीत निशाणी!
 रांगा लावण्याची पद्धत मुंबईत युद्धकाळात अस्तित्वात आली. बसला रांग लावणे, हा मुंबईत एक सर्वमान्य प्रकार होऊन बसला. परंतु नागरी रीती-रिवाजांची फारशी तमा न बाळगणाऱ्या मुसलमान वस्तीत बसकरता रांग लावली जात नाही, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही! क्रॉफर्ड मार्केटपासून जे. जे. इस्पितळाच्या नाक्यापर्यंतच्या कुठल्याही बसस्टॉपवर बसकरता व्यवस्थित रांग लावलेली तुम्हाला दिसून येणार नाही. इथे माणसे बसस्टॉपवर घोळका करून उभी असतात

१८ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा