पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/17

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कशी तरी समजूत घातली. काही वेळाने जीना शांत झाले. मग आम जनसमुदायापुढे ते 'तकरीर' करावयास उभे राहिले. 'कायदे आझम जीना जिंदाबाद'च्या आरोळ्या हवेत उठल्या. जीना भाषण करू लागले आणि ते पहिलेच वाक्य म्हणाले ते असे, “काँग्रेसवाले कहते है मुसलमान बेवकूफ है।"
 जीनांचे आधीचे संतप्त उद्गार आमंत्रितांतील काही मुसलमानांनी ऐकले; पण जनसमुदायाला काही ते ऐकू आले नाहीत. परंतु माईकवर जीनांनी जोराने ओरडून 'तुम सब मुसलमान बेवकूफ हो!' असे जरी सांगितले असते, तरी मुसलमानांनी ते भाषण शांतपणे ऐकले असते- नव्हे, त्यानंतर कायदे आझम जीना जिंदाबाद'च्या घोषणाही दिल्या असत्या.
 इतकी चमत्कारिक कडवी निष्ठा मुसलमानांत कशी निर्माण झाली, याचा विचार करूनही मला उलगडा झालेला नाही आणि तो विचार करणे एका अर्थाने व्यर्थही आहे. हिटलरवर जर्मनांची का निष्ठा होती? हिटरलने जर्मनीचा विनाश केला, असे वाटूनही त्याच्याविषयी आदर बाळगणारे काही जर्मन लोक अजून आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर आलेल्या एका वैफल्याच्या आणि नैराश्येच्या लाटेतही मुसलमान समाजात जीनांविषयीची निष्ठा अद्यापही कायम आहे. या राजकीय प्रवाहापासून वेगळा राहिलेला माझ्यासारखा मनुष्य जेव्हा भेंडी बाजारातून वावरू लागतो, तेव्हा 'ट्रायल ॲट न्यूरेन्बर्ग' चित्रपटातील अमेरिकन न्यायाधीशाप्रमाणे केसरबागेच्या मैदानात जीनांचा आवाज घुमत असलेला त्याला ऐकू येऊ लागतो. त्या आवाजाला, त्या मार्गदर्शनाला, त्या एकमुखी नेतृत्वाला आपण वंचित झालो असल्याच्या जाणिवेची उदासीनता तेथील मुसलमानांच्या चेहऱ्यावर पसरलेली त्याला दिसू लागते.

 परंतु, काळाच्या गतीने आता तिथे काही बदल होऊ लागले आहेत. औद्योगिकीकरणाच्या एका प्रचंड प्रक्रियेने एकसंच मुसलमान समाजाचे विघटन सुरू झाले आहे. कामगारांचा, नोकरी करणाऱ्या पांढरपेशा सुशिक्षितांचा, श्रीमंत व्यापाऱ्यांचा आणि मुंबईच्या तथाकथित कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचे वारे लागलेल्यांचा- असे वेगवेगळे सामाजिक वर्ग मुसलमानांत निर्माण झाले आहेत. त्यांतील पाश्चात्त्य शिक्षणाचे वारे लागलेले लोक कुलाब्यापासून मलबार हिलपर्यंत पसरलेल्या सुखवस्तू वस्तीत राहणे पसंत करतात. ते घरात काट्या-चमच्याने जेवतात. आपसांत (घरातून) इंग्रजी बोलतात. त्यांची मुले कॉन्व्हेंटमध्ये शिकतात. हे लोक कुठल्याही मुसलमान वस्तीत राहणे कमीपणाचे समजतात आणि आपण खरोखरीच कॉस्मोपॉलिटन झालो आहोत, असा स्वत:चा समज करून घेतात. कामगार कुठल्याही वस्तीत राहतो आणि तरीही आपल्या चालीरीतींचे जतन करतो. पांढरपेशा वर्गाची मात्र कुचंबणा होत असते. तो आपल्या

१६ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा