पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मुंबईकर
मुसलमान


 सन १९४६. सकाळची वेळ. ग्रँट रोडहून पायधुनीकडे जाणाऱ्या १६ नंबरच्या ट्रामच्या रस्त्याने मी एकटा चाललो होतो. ट्रामची मला माहिती नव्हती. मी तेव्हा चौदा वर्षांचा असेन. मी घरातून पळून मुंबईला आलो होतो आणि उपनगरातील एका नातेवाइकाकडून भेंडी बाजारात राहणाऱ्या नातेवाइकाकडे चाललो होतो.

 आदल्या दिवशीच हिंदू-मुसलमानांचा दंगा सुरू झाला होता, परंतु माझ्या ते गावीही नव्हते. घरातून पळून आल्याच्या अपराधी जाणिवेने मी अस्वस्थ होतो. आपल्याच विचारांत गढून गेल्यासारखा रस्त्याने चालत होतो. रस्त्याने तुरळक माणसे चालली होती. मला वाटते, ट्राम बंदच होती. पोलिसांच्या गाड्या फिरत होत्या. रस्त्यावरही पोलीस उभे होते. गोलपिठ्यापाशी रस्त्यावर काचांचा आणि सोडा वॉटरच्या फुटलेल्या बाटल्यांचा खच पडला होता. मी पुढे गेलो आणि गोल देवळापाशी आलो, तेव्हा समोर हजारोंचा (हिंदूंचा) जमाव पाहून थबकून उभा राहिलो. तो जमाव देवळापाशी भेंडी बाजाराच्या दिशेने तोंड करून उभा होता. समोर काही अंतरावर मुसलमानांचा तेवढाच जमाव क्रुद्ध होऊन उभा ठाकला होता. या दोन जमावांच्या मधे रस्त्यावर कुणी चिटपाखरूदेखील वावरत नव्हते. तेवढा रस्त्याचा भाग निर्मनुष्य, ओसाड भासत होता. दंगा म्हणजे काय, हे मला तेव्हा कळले! आपण हजारो हिंदूंच्या जमावात एकटे उभे आहोत, याची कल्पना येताच माझ्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिला. मी भेदरल्यासारखा काही वेळ तिथेच रेंगाळत उभा राहिलो. एवढ्यात कुठून तरी पोलिसांच्या लॉऱ्या भरभरून

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । १३