पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/13

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिकल्याने उर्दूचा आपोआपच सराव होऊ शकेल. परंतु सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास उर्दू शिक्षण मुसलमान तरुणांच्या चरितार्थाचा प्रश्न सोडवू शकत नाही. अशा स्थितीत नोकऱ्या मिळण्यास आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत पारंगतता मिळण्यास स्थानिक भाषेच्या अभावी आपण नालायक ठरलो, तर सरकारला अथवा बहुजन समाजाला दोष देणे योग्य ठरेल काय?
 आपल्या धार्मिक शिक्षणाचा सवाल आपण उपस्थित करणार असू, तर तोही एक प्रकारे चुकीचा ठरेल. बंगाली मुसलमानाला बंगालीमधून धार्मिक शिक्षण मिळू शकते, बोहरी व गुजराती मुसलमान कुराण व तरतीब यांसारखी धार्मिक पुस्तके गुजरातीतून वाचू शकतात; मग महाराष्ट्रीय मुसलमानाला मराठीतून ती वाचण्याची अडचण का वाटावी? श्री. सय्यद अमीनसारख्यांनी 'इस्लाम आणि संस्कृती'सारखी पुस्तके मराठीत लिहिल्यामुळे उलट अरबी न समजणाऱ्या मुसलमानांचा फायदाच झाला आहे. या गोष्टी आम्ही सामान्य मुसलमानाला समजावण्याच्या प्रयत्न केला पाहिजे.
 इथल्या सामाजिक जीवनात पूर्णपणे समरस व्हायचे असेल, तर आजची त्रिशंकू अवस्था आपल्याला आता सोडली पाहिजे. स्थानिक जनतेशी असलेले आपले सांस्कृतिक संबंध आपण अधिकच दृढ केले पाहिजेत. इथल्या परंपरांचे जतन करून आपण खऱ्याखुऱ्या अर्थाने महाराष्ट्रीय म्हणून ओळखले जाऊ या. मराठी सारस्वताचा आपला व्यासंग आपण वाढवू या. तुकारामाचे अभंग आपल्या ओठांवर खेळवू या. ज्ञानेश्वरीच्या अध्यायांची आपण पारायणे करू या. समर्थांच्या दासबोधाचे मर्म आपण समजावून घेऊ या. मराठी शाहिरांच्या वीररसाने आपण रोमांचित होऊ या. हे साहित्य-भांडार केवळ हिंदूंचे नाही, आपलेही आहे. मराठी सरस्वतीच्या अंगावरची ती बहुमोल लेणी आहेत.
 बदलता कालप्रवाह ओळखून आजचा मुस्लिम समाज आता महाराष्ट्राशी समरस होण्याची वाट शोधीत आहे. पूर्वीचे संस्कार त्याला बिचकावीत आहेत. अशा वेळी आपण तरुणांनी त्याला साह्य केले पाहिज. महाराष्ट्रातला मुस्लिम तरुण हा नवा दृष्टिकोन स्वीकारील, याबद्दल मला शंका वाटत नाही!

'मौज' साप्ताहिक :
 
११ एप्रिल १९५४
 


(हा लेख प्रसिद्ध झाला तेव्हा हमीदभाईंचे वय होते २२ वर्षे.)

१२ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा