पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फक्त बुद्धिवादाला शक्य आहे. परंतु जेव्हा ते शक्य होईल, तेव्हा देवीलाच नारळ देणे बंद होणार नाही- कशालाच न मानण्याची वृत्ती निर्माण होईल!
 अनेक वर्षांच्या शिकवणुकीनेही जर आपण या परंपरा नष्ट करू शकलो नाही; तर मग वेगळेपणाचा, अलिप्तपणाचा प्रयोग आपण किती दिवस करत राहणार? आता आपण उलट दिशेने आपल्या प्रयोगाला सुरुवात केली पाहिजे. वेगळेपणाच्या परंपरा वाढवण्याऐवजी एकमेकांशी संबंधित असलेल्या परंपरेच्या जोपासनेचे प्रयत्न केले पाहिजेत.
 हे करायचे, तर आपल्याला आपले शैक्षणिक धोरण आधी बदलले पाहिजे. फुटीरपणाच्या शिकवणुकीमुळे इथल्या बहुजन समाजाच्या आणि मराठी भाषेच्या द्वेषावर पोसला गेलेला-वाढलेला एक पुढारीवर्ग आमच्या समाजात निर्माण झाला आहे. सर्वसामान्य मुसलमान समाज अज्ञ, अजागृत राहिल्यामुळेच या वर्गाचे पुढारीपण टिकून राहत असल्याने तो नेहमी सबंध समाजाला चुकीचा मार्ग दाखवतो. इतकेच नव्हे, तर स्थानिक जीवनाशी समरस व्हावे असे इच्छिणाच्या नि त्याप्रमाणे प्रयत्न करणाऱ्या मुस्लिम तरुणांविरुद्ध लोकमत भडकावण्याचाही सतत प्रयत्न करण्यात येतो. परंतु यामुळे आलेली कटुता विसरून जाऊन, इथल्या बहुजन समाजावर अथवा सरकारवर विसंबून न राहता मुस्लिम बहुजन समाजाला या धोरणाचा अंतिम परिणाम समजावून देण्याचा प्रयत्न आम्ही मुस्लिम तरुणांनीच केला पाहिजे. असे प्रयत्न आपण केल्यास महाराष्ट्रातला बहुजन समाज आपल्याला खचित सहकार्य देईल. मुस्लिमांनी आपल्यात सामावून जावे, असेच त्यालाही वाटते. आपले स्वागत करायला तो तयार आहे- नव्हे, उत्सुक आहे!
 आजचा सर्वसामान्य मुस्लिम तरुण गोंधळलेला आहे. उद्याच्या महाराष्ट्रातील आपले स्थान कोणते, याची त्याला निश्चिती वाटत नाही. उदासीनतेच्या पोटी आलेला हा अलिप्तपणा नष्ट व्हावा असे वाटत असेल; तर आधी आपण आपल्या मराठी भाषेशी, संस्कृतीशी, इतिहासाशी आणि परंपरेशी समरस होऊ या. आपली मातृभाषा आपण आत्मसात करू या. उर्दू शिकायचीच असेल, तर कोणी आपल्याला प्रतिबंध केलेला नाही. उर्दूच काय, पण भारतातल्या आपल्या इतर भाषाभगिनींचाही मुसलमानांनी अभ्यास करावा, त्यात पारंगतता मिळवावी, असे मी म्हणेन!

 उर्दूचे प्रस्थ आपण किती ठेवायचे, याचाही आता विचार झाला पाहिजे. भारतात कुठल्याही प्रदेशाची भाषा म्हणून उर्दूला स्थान राहिलेले नाही. लखनऊ हे उर्दूचे केंद्र समजले गेले, परंतु तिथेही तिला एक प्रादेशिक भाषा म्हणून मान्यता नाही. यामुळे उर्दूच्या अस्तित्वालाच एक प्रकारचे आव्हान दिले गेल्यासारखे आहे. उर्दूची लिपी बदलली आणि देवनागरी लिपीचा तिने स्वीकार केला, तरच एक भाषा म्हणून भारतात ती तग धरू शकेल. तसे झाल्यास राष्ट्रभाषा म्हणून हिंदी

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ११