पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सरकारचे धोरण जरी जाणूनबुजून चुकीचे असले, तरी आम्ही मुसलमानांनीच - आता खरे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. सरकार चुकते, असे म्हणून आमची जबाबदारी टळत नाही; आमच्या चुका लपल्या जात नाहीत. गेल्या अनेक वर्षांच्या सततच्या शिकवणुकीने का होईना; मराठी भाषेशी, संस्कृतीशी आणि प्राचीन परंपरेशी आम्ही कायमची फारकत मिळवू शकतो का? उर्दू आमच्यात पूर्णपणे रुळली का? उर्दूमय झालेल्या आमच्या या तरुणांचे उद्याच्या महाराष्ट्रातले स्थान कोणते राहील, याचा तरी आपण शांतपणे विचार करू या. उर्दूच्या अर्धवट ज्ञानाने आणि भोवतालच्या दैनंदिन जीवनातल्या मराठीच्या सरावाने जी भाषा उर्दू म्हणून बोलली जाते, ती पूर्णपणे धेडगुजरी असते. पुढील काही नमुने पाहण्यासारखे आहेत“मुजे जानाच चाहिये", "वो आदमखान मऱ्या ", "तुम इदर काय कू आया?" इत्यादी. कोकणातल्या मुसलमानांच्या जीवनात मोडी लिपीसकट मराठी मुरली आहे. घरात बोलली जाणारी बोली कोकणी असते, उर्दूशी तिचा काही संबंध नसतो.

 भाषा, रीती-रिवाज, परंपरा, चालीरीती, पेहराव या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आमच्या परंपरा कोणत्याच बाबतीत भिन्न नाहीत, हे दिसून येईल. लग्नप्रसंगी आमच्यात जी गीते गायली जातात, त्यात पीरांच्या उल्लेखाबरोबर नजीकच्या परशुरामाचादेखील उल्लेख आहे! लग्नाच्या चाली-रीतीत तर इथल्या बहुजन समाजाच्या चालीरीतीचा फार मोठा प्रभाव आहे आणि यात वेगळे, वाईट असे काहीही नाही. महाराष्ट्रातल्या मुस लमानाचा पेहरावही काही वेगळा नाही. क्वचित आढळणाऱ्या फेझ टोप्या सोडल्या; तर खाली धोतर, अंगरखा आणि वर फेटा असला अस्सल मराठी पोशाख आमच्याकडचा मुसलमान घालतो. बायकांच्या गळ्यात मंगळसूत्र असते आणि काही ठिकाणी कुंकू लावणाऱ्या मुसलमान स्त्रियाही मी पाहिल्या आहेत. लग्नाच्या आणि गरोदरपणाच्या वेळी ओटीत नारळ देण्याची प्रथा काही मुसलमानी नाही! कुठल्याही गावात गावच्या देवीला पीराइतकाच मान देण्यात येतो आणि अनेक प्रयत्न करूनही तो अजून नष्ट करता आला नाही! मागे मुस्लिम लीगच्या ऐन चळवळीच्या वेळी गावच्या देवीला नारळ देऊ नये, असा प्रयत्न काही तरुणांनी आमच्या गावात केला. परंतु पुरुषांच्या नकळत बायकांनी देवीला नारळ पोचते केल्याचे मला माहीत आहे! गेल्या पन्नास वर्षांत आमच्या गावात गोहत्या घडलेली नाही. पुष्कळसे तरुण गोमांस खातात, परंतु आमच्या बायका ते घरात शिजवायलाही तयार होत नाहीत! मुसलमान व्यापाऱ्याच्या जमाखर्चाच्या वह्या दिवाळीत बदलतात- मोहरमपासून व्यापारी वर्ष मोजण्याची प्रथा महाराष्ट्रीय मुसलमानांत क्वचितच दिसून येते. या सगळ्या परंपरा, हे संस्कार शुद्ध मराठी आहेत. कदाचित यांत श्रद्धेचाही भाग असेल (तो आहेच.) ही श्रद्धा उडवणे फक्त बुद्धिवादानेच शक्य होईल. अनेक वर्षांचे संस्कार नष्ट करणे

१० । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा