Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मादाम क्यूरी
९३
 


धनाकडे जास्त लावले; आणि १९११ साली रसायन विषयांतलें नोबेल प्राइज तिनें पुन्हा एकदां मिळविलें. पहिल्या महायुद्धांत रेडियमचा उपयोग इस्पितळांत होत आहे, हें पाहून तिला फार आनंद झाला; आणि मग मादाम पेरीवर मानसन्मान आणि पदव्या यांचा वर्षाव होऊं लागला! दरवेळीं तिला नवऱ्याची आठवण मात्र सारखी होत असे.
 या युद्धानंतर पोलंड स्वतंत्र झालें. तेव्हां पेरीला वाटू लागलें कीं, आपल्या मातृभूमीत एक संशोधन-मंदिर बांधावें; व रेडियमच्या साह्याने कॅन्सर बरा करण्याची व्यवस्था तेथें करावी. १९२५ साली मेरी ही पोलंडला गेली; व या संस्थेची कोनशिला तिनें बसविली. आपल्या देशाची कन्या एवढी सुविख्यात बनून पुन्हा स्वदेशाला परत येत आहे, हें पाहून वार्सा राजधानींतील लोक आनंदाने वेडे झाले. १९२३ साली या शोधाचा पंचविसावा वाढदिवस साजरा झाला. तेव्हां फ्रान्स देशांतील झाडून सारे विद्वान्, अधिकारी, प्रतिष्ठित लोक, पत्रकर्ते इत्यादिकांची मोठीच गर्दी जमली; आणि त्यांनीं मेरीचा केवळ जयजयकार केला. परंतु हळू हळू तिची प्रकृति खालावत चालली; तिची दृष्टि मंद होत चालली; आणि आपण कशाला तरी विनाकारणच भीत आहों, असें तिला वाटूं लागलें. १९३४ सालीं मेरीला दुखण्यानें गांजले. तिच्या पित्ताशयांत एक गांठ आली आहे, असें दिसून आलें. तिचा बाप याच दुखण्यानें वारला होता. थोडयाच दिवसांत तिचीं फुफ्फुसे सुजली; आणि आपलें आतां संपत आले आहे, असें तिचें तिला स्वच्छ दिसूं लागलें. तिने स्वतः थर्मामीटर लावून पाहिला; पण ताप किती आहे, हें तिच्या ध्यानांतच येईना! ती म्हणाली, 'माझी आठवण नाहींशी होत आहे.' आणि खरोखरच कोणाहि माणसाचें नांव तिला आठवेनासें झालें. स्वतःच्या मुलींचें नांव सुद्धां तिला आठवेना. नेहमींप्रमाणें डॉक्टर आले, तेव्हां ती म्हणाली, 'डॉक्टर, आतां काय पाहतां? पुरें झालें. मला आतां स्वस्थ पडूं द्या!' १९३४ च्या जुलै महिन्याच्या चौथ्या दिनांकीं पहाटेच्या सुमारास मेरी क्यूरीनें आपला देह ठेवला!
 रेडियम जशी झळकते, तसें मेरी क्यूरीचें नांव प्रथम संशोधकांत आणि मग साऱ्या जगांत झळकत राहिलें आहे. स्त्रीजात काय करूं शकतें, असें म्हणणारांना मेंरी हें एक चूप बसविणारें प्रमाणच जगाच्या हातीं लागलें. स्त्रीजातीची उंची सपाट्यासरशीं वाढली; आणि एकंदर मानव्य तत्त्वशोधनांत कसें पुढें चाललें आहे, हे जगाच्याहि प्रत्ययास आलें.

● ● ●