Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
कर्तबगार स्त्रिया
 


अभ्यासासाठी परत पॅरिसला यावें. तिचा हा निर्णय पेरी क्यूरीला अर्थातच फार शहाणपणाचा वाटला.
 मार्जा परत आली; आणि तिचा पी. एच. डीचा अभ्यास सुरू झाला. या अभ्यासांत पेरी क्यूरीचें तिला मोठेंच साहाय्य होत असे. क्यूरीच्या मनांत आपल्या संबंधानें कोणची भावना उद्भवली आहे, याची सूक्ष्म वर्दी मार्जाला अर्थातच लागली होती. त्याची ती भावना दिवसेंदिवस बळावत चालली; आणि त्यानें तिला मग प्रत्यक्षच मागणी घातली. मार्जाला निकाल करतां येईना. तिनें हें प्रेम-प्रकरण वर्ष-सहा महिने तसेंच घोळत ठेवलें; कारण फ्रेंच माणसाशीं लग्न करणें म्हणजे मातृभूमीला अंतरणें होय, हें तिला पक्के माहीत होतें. तथापि तिचाहि निश्चय हळू हळू ढासळू लागला; आणि लौकरच पोलंड देशांतील ही मार्जा आतां मेरी क्यूरी बनली.
 दोघेही साधारणपणें गरीबच होतीं; आणि म्हणून त्यांनी आपला मधुचंद्रमास सायकलवरच्या रपेटीनेंच साजरा केला. मेरीला लवकरच एक मुलगी झाली. पण प्रापंचिकपणाची ही आघाडी जरी दिवसेंदिवस वाढत चालली होती, तरी तिची शास्त्राभ्यासाची आवड यत्किंचितहि कमी झाली नाहीं. सैंपाकपाणी करणें, गृह व्यवस्था ठेवणें, इ० कामांत तिचे रोज तीन तास जात. तेवढे गेल्यानंतर रोज आठ आठ तास ती शास्त्राभ्यासांत आणि संशोधनांत घालवू लागली. सरावानें आणि वयाबरोबर तिच्या बुद्धीची झेप वाढू लागली. आणि पेरी क्यूरी हा कितीहि बुद्धिमान् असला, तरी त्याला हळू हळू असें दिसूं लागलें कीं, बायकोची बुद्धि आपल्यापेक्षां रतिभर जास्तच चलाख आहे. मेरीला ठराविक वाटेनें जाणें अगदी पसंत नसे; आणि कांहीं तरी एखादा बारीकसारीक शोध लावावा, आणि पीएच. डी. ची पदवी पदरांत पाडून घ्यावी, हेंहि तिला अवमानाचे वाटे. कांहीं तरी निराळें संशोधन करावें, एखादा मोठा शोध लावावा, ज्या भूमीवर कोणाचा पायहि पडला नाहीं, त्या भूमींत शास्त्रशोधाचा हमरस्ता तयार करावा, अशी कांहीं एक चढाईची वासना तिच्या मनांत वाढत चालली होती. हळू हळू अभ्यासाच्या कामी नवऱ्याच्या तंत्रानें चालणें, तिनें सोडून दिलें. नवऱ्यानेही पडतें घेतलें; आणि तिच्या तंत्राने चालून जें काय साह्य तिला करतां येईल, तें तो करूं लागला.
 हेन्री बेकेल या नांवाच्या एका फ्रेंच शास्त्रज्ञाने प्रसिद्ध केलेले आपल्या शोधाचें इतिवृत्त एकदां मेरीला वाचावयास सांपडलें, त्यांत असें दिसलें कीं,