Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मादाम क्यूरी
८९
 


ण्याची जागा, म्हणजे चांदईकडे खिडकी असलेली माळ्यावरची एक लहानशी खोली होती. मेरीच्या देशांतील एक बडा गृहस्थ या सुमाराला पॅरिसमध्ये आला. त्याला ऐकून माहीत होतें कीं, आपल्या देशांतील एक फार हुशार मुलगी पॅरिसमध्ये अभ्यास करीत असते. तिचा पत्ता काढून त्यानें तिला आपल्या बंगल्यावर बोलवून घेतलें; आणि बरीच विचारपूस केली. तिनें अशी एक अडचण सांगितली कीं, प्रयोग करून पाहण्याला पुरेशी जागा नाहीं. तेव्हां तो बडा गृहस्थ म्हणाला, "पेरी क्यूरी नांवाचा एक संशोधक मला माहीत आहे. तो तुला जागा देतो कां पाहू. तूं उद्या पुन्हा ये. मी त्यालाहि बोलावून ठेवतो." दुसऱ्या दिवशीं सगळ्यांची बैठक झाली. पेरी क्यूरीनें मार्जाला जागा देण्याचें पत्करलें. क्यूरीची आणि मार्जाची ओळख झाली.
 ही कांहीं कादंबरी नव्हे; तरी पण मार्जा ही फार सुस्वरूप होती हें सांगितलेच पाहिजे. पेरी क्यूरी हा तिच्याइतका देखणा नसला, तरी दिसायला साधारण बरा होता. मात्र संशोधनाच्या कामांत त्याची मोठीच प्रगति झालेली होती. शाखाभ्यासासाठी दोघांनाहि पुन्हा पुन्हा एकत्र यावें लागे; आणि मग तो कांहींसा गबाळा दिसणारा माणूस मार्जाच्या तोंडाकडे टक लावून पाहूं लागला. आपण बुद्धिमान् आहों, हें मार्जाला कळून चुकलें होतें; पण पेरीची बुद्धि आपल्याहि पेक्षा जास्त तल्लख आहे, हें तिच्या प्रत्ययाला आलें. विशेष परिचय झाल्यावर, तो एकदा तिच्या घरीं आला. घरांत अठरा विश्वे दारिद्र्य होतें. तेथें चांगली वस्तु म्हणजे फक्त मार्जा हीच काय ती. बाकीं सारें दैन्यच पसरलेलें होतें. मार्जाला फार लाज वाटली; आणि पेरीला तिची दया आली.
 एम्. ए. ची परीक्षा जवळ आली; आणि पेरीला दिसू लागलें कीं, पदवी घेतल्यावर मार्जा पोलंडमध्ये आपल्या घरीं जाईल. 'तूं जाणार कां?' असें त्यानें तिला मुद्दामच विचारलें, तेव्हां तिनें सांगितलें, "कोणाहि पोलिश माणसानें परदेशांत जाऊन सुखी होऊन राहणें म्हणजे पोलिश मातृभूमीचा द्रोह होय!" यावर पेरीनें असा मुद्दा काढला कीं, "हें खरें असेल; पण एम्. ए. नंतरचा तुझा शास्त्राभ्यास मात्र पोलंडमध्यें एकदम बंद पडेल." हा मुद्दा मार्जालाहि पटला. देशाभिमानापेक्षां शास्त्राभ्यासाची आवड तिच्या मनांत बळावत चालली होती; आणि म्हणून तिनें ठरविलें कीं, एकदा पोलंडमध्यें घरीं जावें, आणि