Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फ्रॅन्सिस विलर्ड
८५
 


 हळू हळू तिची स्त्रीजीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. तिचें ज्ञान, तिची गंभीर वृत्ति, यांचा परिणाम विद्यार्थिनींवर इतका होत असे, कीं बाकीच्या शिक्षकांच्या पोटांत मत्सराग्नि भडकूं लागे. ते म्हणत, 'ही कांहीं आमच्यापेक्षां विद्वान नाहीं खास; पण ही साऱ्या पोरींना वेड लावतें; याचें कारण हिच्यापाशीं संमोहनास्त्र असावें.'
 शिक्षिकेचें काम कांही वर्षे केल्यावर फॅन्सिसला वाटूं लागलें कीं, 'आपण कुचंबत आहों, आपल्या मनाची वाढ व्हायला हवी असली, तर एकदां युरोपांतून जाऊन आलें पाहिजे.' इतक्यांत तिचा बाप वारला. हे दुःखहि विसरावें, आणि युरोपांतील स्त्री- जीवनाची हालहवाल पहावी, अशा दुहेरी हेतूनें ती १८६८ त युरोपांत गेली.
 युरोपियन शहरांतील सुंदर हवेल्या, उंच उंच प्रासाद, रमणीय उद्यानें, भव्य स्मारके, श्रीमंत आणि समृद्ध बाजारपेठा, हा सारा देखावा पाहून ती अगदीं दिपून गेली; आणि आपला देश या मानानें कांहींच नाहीं, असें तिला वाहूं लागले. तथापि, तेथील लोकांतील उच्च-नीच भाव, गरिबी आणि श्रीमंती यांचा शेजारधर्म, आणि गरिबांच्या जीविताची होत असलेली उपेक्षा, हीं पाहून तर तिचा जीव अगदीं गुदमरून गेला. तेव्हां या दृष्टीनें पाहतां आपला देश अधिक चांगला आहे, अधिक न्यायी आहे, असें तिला वाटूं लागलें; कारण सर्वांना सारखी संधि मिळावी, आणि नशिब काढण्याचा परवाना कोणालाच नाकारूं नयें, हें तत्त्व अमेरिकेनें आधींच पत्करलेलें होतें. मात्र, आपल्या देशांतहि बायकांना मत नाहीं, गरीब मजुरांची दाद कोणी घेत नाहीं, आणि दारूखालीं सारा समाज झिजून जात आहे, हें चित्र तिच्या डोळ्यापुढे सारखे उभे राहूं लागलें. येथेंच तिनें हा त्रिविध संकल्प सोडला:—
 दारूचें उच्चाटन केलें पाहिजे; स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला पाहिजे; आणि मजुरांची संघटना केली पाहिजे. हाच तो संकल्प होय.
 अमेरिकेत परत येतांच दारुबंदीची मोहीमच तिनें चालू केली. टेम्परन्स म्हणजे मितपान— कोणी म्हणतात कीं अमेरिकेची चळवळ मितपानाची- म्हणजे 'दारु फार पिऊं नये' अशा स्वरूपाची होती. पण तिला दारूचें उच्चाटणच करायचें होतें. फ्रॅन्सिस् ही प्रत्येक गुत्त्यापुढें अन् क्लबापुढे जाऊन गुडघे टेकून दारुड्यांची