मिळतील तीं तीं पुस्तकें जोशुआनें येणाऱ्या, जाणारांच्या हस्तें जमा केलेलीं होतीं. त्यांत बायबल हें अर्थातच मुख्य होतें. या धर्मपुस्तकाचें शिक्षण तो आपल्या मुलींना मोठ्या आग्रहानें आणि गंभीर बुद्धीनें देई. तहान लागली तर शेजारच्या झऱ्यावर जाऊं, आणि त्याच्या मधुर आणि शीतल जलानें आम्हीं आपली तृषा शांत करूं, पण कोणच्याहि मादक पेयाला दुरूनसुद्धां शिवणार नाहीं, अशी शपथ जोशुआनें आपल्या मुलींकडून घेवविली.
तथापि त्यानें ही करडी धर्मबुद्धि त्यांच्या ठिकाणीं किती जरी बिंबवलेली असली, तरी हरतऱ्हेच्या वाचनाकडे मुलींचें लक्ष साहजिकच जाई. फ्रॅन्सिस आतां अठरा वर्षांची झाली होती. तिला कादंबरीवाचनाचा छंद फारच लागला. एके दिवशीं बाप रानांतून परत येऊन पाहतों, तो फ्रॅन्सिस एका कादंबरीत तोंड खुपसून बसलेली! बाप रागाने लाल झाला. मुलगी पहिल्यापासूनच थोडीशी फटकळ होती. ती त्याला म्हणाली:— 'बाबा, मी आतां अठरा वर्षांची झालें आहे. काय वाचावें अन् काय न वाचावें हें मला आतां चांगलें कळते.' असें म्हणत असतांना बापाकडे बघत ती मिष्किलपणें हंसत होती. बापाचा राग क्षणांत मावळला; आणि तो विनोदानें म्हणाला. "पोरी, तूं आतां प्रौढ झाली आहेस खरी; आईच्याच जातीची दिसतेस!"
आपण प्रौढ स्त्री झालों, या विचारांत फॅसिस् अगदी दंग होऊन गेली. प्रौढ स्त्री बनणें म्हणजे एक मोठी मानाची पदवी पावणें होय, असें तिला वाटत असे. आईचा घरांतला अधिकार, व क्वचित् बापावरहि चालणारें तिचें वर्चस्व हीं पाहिल्यावर तिचें मत असें व्हावें हें बरोबर होतें. परंतु तिनें जरी घी पाहिलेलें असले, तरी अजून बडगा देखला नव्हता. एके दिवशीं तो तिच्या सहज नजरेस पडला.
कसली तरी एक निवडणूक चालूं झाली होती; विलर्ड मंडळी जरी रानावनांत येऊन राहिलेली होती, तरी मतांचा अधिकार त्यांना मिळालेला होता. निवडणुकीचा दिवस उजाडला; आणि फ्रॅन्सिसचा बाप व भाऊ मत देण्यासाठीं गाडींतून निघाले. हे दोघे मत देण्यासाठीं जात आहेत, आणि आपण मात्र घरीं बसलों आहोंत याचें फ्रॅन्सिसला मोठेंच वैषम्य वाटलें. अमेरिकेत मताचा अधिकार तेव्हां फक्त पुरुषांना होता; आणि बायका किती जरी शहाण्या असल्या, तरी त्यांना 'मत' नसे!
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/८७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फ्रॅन्सिस विलर्ड
८३