| हिला देवाचें राज्य स्थापावयाचें होतें! |
फ्रॅन्सिस विलर्ड : ८:
फ्रॅन्सिस् इ. विलर्ड या स्त्रीचें चरित्र कांहींसें अद्भुतच म्हटले पाहिजे. वस्ती कोणीकडे, शिक्षण कशा प्रकारचें आणि पराक्रम कोणचा हें पाहिलें म्हणजे चरित्रांतला अद्भुतपणा लक्षांत येतो.
आपल्याला हे माहीत आहे कीं, युरोपांतील गोऱ्या लोकांची वस्ती अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेशांत पहिल्यानें झाली. तेथून हे लोक पश्चिमेच्या रोखानें पसरत चालले. सामाजिक जीवनाचा जो बनाव बनलेला होता, तो ज्यांना मानवला ते त्यांत आपली सोय कशीना कशी करून घेत. परंतु, ज्यांना तो मानवत नसे, ते पश्चिम दिशेकडे तोंड करून चालू लागत. त्या दिशेला अफाट मुलुख रिकामा पडलेला होता. हिंमत असेल तर तिकडे जावें; चांगलीशीं जमीन पाहून ती 'आपली' म्हणून ठेवावी; या जमिनीवर राबावें, आणि मग पोटभर भाकरी खावी, असा शिरस्ताच पडून गेलेला होता.
पण हें सारें सांगायला जरी सोपें असलें तरी करायला अतिशय अवघड असे. बायकापोरांना घेऊन, ज्या ठिकाणीं शासनसंस्थेचें कसलेंहि संरक्षण नाहीं, कदाचित् जेथें वन्य पशू अजूनहि बेदरकारपणें हिंडत असतील आणि ज्या जमिनीवरील जंगलाचा उन्माद केवळ भयप्रदच वाटावा तेथें जाऊन वस्ती करावी; आणि पोटाला मिळवावें, ही गोष्ट मोठी बिकट होती. शिक्षणाची सोय नाहीं; हवी ती वस्तु वेळेला मिळत नाहीं; कांहीं होऊं लागलें तर जेथें औषधपाण्याची कसली हि सोय नाहीं; टपालाची ने-आण जेथें कोणाच्या गांवींहि नाहीं; आणि कदाचित् जेथें जिवावर बेतण्याचे प्रसंग अनेकदां येण्याचा संभव, तेथें नवा प्रपंच थाटण्यासाठीं जाऊन रहाणें केवळ निर्भय मर्दांनाच साधण्यासारखे होतें.
फॅन्सिसच्या बापावर असाच स्थलांतराचा प्रसंग आलेला होता. कारणें कोणतींहि घडलेलीं असोत—- न्यूयार्क परगाण्यांतील आपला वाणसौद्याचा धंदा त्याला किफायतीनें करतां येईना; किंवा त्याच्या हातांत तो राहीना— शेवटीं आतां येथें