चरित्रे तिनें जवळून न्याहळून पाहिलीं; शेकडों घरांतील प्रापंचिक रहस्यें समजावून घेतलीं; अशा मुलांच्या तोंडून अभावितपणें कोणचे उद्गार निघतात, त्यांच्या अतृप्त वासना कोणच्या असतात, आणि काय झाले किंवा ऐकलें म्हणजे त्यांचा दुर्मुखलेपणा क्षणभर दूर होतो, याचें तिनें बारकाईनें निरीक्षण केलें. हीं सारीं प्रमाणें तिच्या हाताशी असल्यामुळे तिच्या बोलण्याला हळूहळू प्रामाण्य प्राप्त झालें; आणि मग या प्रश्नाच्या चौकशीसाठीं पार्लमेन्टनें जेव्हां एक समिति नेमली, तेव्हां तिच्यापुढे झालेली आपल्या या मेरीची जबानी सर्वत्र गाजली. मेरी कार्पेंटर म्हणजे या प्रश्नावर अधिकारवाणीनें बोलणारी स्त्री, असा तिचा लौकिक झाला.
लवकरच मेरीनें 'गुन्हेगार लोकांच्या मुलांना सुधारणाऱ्या शाळा' या नांवाचें एक पुस्तक लिहिलें. यानंतर लवकरच 'उनाड मुलें' या नांवाचा ग्रंथहि तिनें लिहिला. 'भिकाऱ्यांची मुलें' हेंहि असेंच एक पुस्तक तिनें लिहिलें. विषय अगदीं नवा असल्यामुळे आणि मेरीचें लिखाण जिवंत सहानुभूतीनें झालेलें असल्यामुळे सर्व देशभर या पुस्तकांचा जयजयकार झाला; आणि शेवटीं १८५४ त गुन्हेगार मुलांच्या सुधारणेसाठी कायदा केला पाहिजे, असें विधेयक ब्रिटनच्या लोकसभेपुढें येऊन पासहि झालें. अनेक ठिकाणीं सरकारनें अशीं सुधार-गृहें (Remand-Homes) सुरूं केलीं.
मेरी कार्पेंटर हिला या कामीं अनेक मैत्रिणी मिळाल्या. त्यांत लेडी नोल बायरन् ही प्रमुख होती. या श्रीमंत स्त्रीचा आणि मेरीचा परिचय चमत्कारिक तऱ्हेनें झाला. मेरीचा भाऊ विल्यम कार्पेंटर हा लॉर्ड लव्हलेस् याच्या घरीं शिकवावयास जात असे; आणि या लव्हलेसनें लॉर्ड बायरनची एकुलती एक मुलगी आडा हिच्याशी लग्न केलें होतें. स्वाभाविकच विल्यम कार्पेंटरच्या द्वारां आडाची आई म्हणजे लॉर्ड बायरनची बायको हिची आणि मेरीची ओळख झाली. या श्रीमंत स्त्रीला मेरीचें काम पाहून इतका आनंद झाला, कीं आपल्या जवळची सर्व साधनसंपत्ति या कामी लावावी, असें तिला वाटूं लागलें.
लेडी बायरन् हिनें 'रेड लॉज' या नांवाची ब्रिस्टल येथें असलेली एक मोठी इमारत खरेदी केली; आणि या इमारतींत दुराचारी बनलेल्या आणि आपत्तींत सांपडलेल्या तरुण मुलींना ताळ्यावर आणण्यासाठीं एक शाळा तिनें सुरू केली. 'रेड लॉज' ही एक फार पुराणी इमारत होती. अनेक राज-
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/७९
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मेरी कार्पेंटर
७५