Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
कर्तबगार स्त्रिया
 


घटना घडून आली आणि मेरीच्या मनाला एक निराळाच झोका मिळाला. या अकल्पित घटनेचे स्वरूप थोड्या विस्ताराने सांगितले पाहिजे.
 राजा राममोहन रॉय हा आधुनिक काळांतील भारतांतील पहिला सुधारक होय. बंगाल्यांत इंग्रजांचें राज्य इतर प्रांतांच्या आधीं झालेले असल्यानें ख्रिस्ती मिशनऱ्यांची पैरवी तिकडे बरीच झालेली होती. सामाजिक आणि धार्मिक मतांत मोठी चलबिचल उडून राहिली, आणि 'आपले आजपर्यंत सारेच चुकत आलें आहे' असा तेव्हांच्या लोकांचा समज झाला. राजा राममोहन रॉय हा तिकडील एक उच्चकुलीन ब्राह्मण असून प्राचीन विद्येचें त्याचें अध्ययन चांगलें झालेलें होतें. इंग्रज लोकांची राज्यकारभाराची तऱ्हा, त्यांचें साहस, त्यांची विद्याभिरुचि आणि त्यांच्या मिशनऱ्यांचे धर्मप्रसारासाठीं चाललेले यत्न हीं पाहून राममोहन रॉय अगदीं विस्मित होऊन गेला होता. त्याच्या मनाचा ओढा ख्रिस्ती धर्माकडे होऊं लागला. मूर्तिपूजेसंबंधानें त्याला पराकाष्ठेची अप्रीति उत्पन्न झाली. संस्कृत, पर्शियन व अरेबिक या तीनहि भाषा त्याला फार चांगल्या येत होत्या, आणि म्हणून मूर्तिपूजा व इतर सुधारणेचीं मतें यासंबंधींचीं अनेक पुस्तकें त्यानें या तीनहि भाषांत लिहिली. इंग्रजी भाषेतहि येशू ख्रिस्ताच्या मूलभूत सिद्धांतासंबंधानें त्यानें एक ग्रंथ लिहिला. होतां होतां शेवटीं आपण इंग्लंडांतच जावें आणि तेथें धर्माचा तौलनिक अभ्यास करावा, असें त्याला वाटूं लागलें; आणि त्याप्रमाणें तेव्हांच्या त्या दिवसांत त्याने परदेशगमनहि केलें.
 तो ब्रिस्टल येथें गेला, तेव्हां त्याची आणि डॉ. कार्पेंटर याची गांठ पडली. डॉ. कार्पेंटर हा अध्यात्मवादी लेखक होता, हें मागें सांगितलेच आहे. कार्पेंटर व राजा राममोहन रॉय यांच्या पुष्कळ चर्चा चालत; आणि त्या ऐकावयास मुलीहि बसत. राममोहनच्या विचाराचा पल्ला आणि त्याच्या मनाचें विशाल क्षितिज यांचा मेरीच्या मनांवर विलक्षण परिणाम झाला. तिचा बाप धर्मपंडितच होता; आणि त्याच्या मुखांतून धार्मिक प्रमेयांचें विवेचन तिनें कितीदा तरी ऐकलेलें होतें. पण या हिंदु पंडिताच्या विवेचनाची छाप तिच्या मनावर जास्तच बसली. हिंदुस्थानांत स्त्रीशिक्षण पसरावें, अशी राजा राममोहन यांचीहि इच्छा होती. हें काम आपण करावें, आणि शिक्षणाच्या द्वारा भारतांतील अज्ञानाचा निरास करावा, अशी वासना मेरीच्या मनांत उत्पन्न झाली. हें सारें पुढें केव्हांतरी