Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिनें गुन्हेगार मुला-मुलींना माणसांत आणलें!


मेरी कार्पेंटर : ७ :


 डॉ. लँट कार्पेंटर हा अध्यात्मविद्येवर लिहिणारा एक मोठा ग्रंथकर्ता होऊन गेला. पहिल्यापासूनच त्याचें मन धर्मप्रवण असल्यामुळे त्यानें व्यवसायहि उपदेशकाचाच पत्करला. त्याची बायकोहि फार सालस आणि धर्माचा सतत विचार करणारी होती; अर्थात् घरांतील सारें वातावरण याच कल्पनांनीं भरलेलें असे. परमेश्वराचे चिंतन आणि मानवाची सेवा हे जे दोन धर्मांचे भाग ते या पतिपत्नींना चांगले अवगत होते. हीच त्यांची धर्मबुद्धि त्यांच्या सर्व मुलांतहि उतरली. मेरी कार्पेंटर ही १८०७ मध्यें जन्मली. मुलीला मेरी हें नांव देण्यांत आईबापांनीं आपली हीच बुद्धि प्रगट केली असें म्हटलें पाहिजे. मुलांना आणि मुलींना शिक्षण देण्याच्या कामी डॉ. कार्पेंटर हा अतिशय दक्ष असे. आपल्याला पसंत असलेलीं मतें आणि मनोज्ञ वाटणाऱ्या भावना यांचा ठसा मुलांच्या मनावर आईबापांनीं लहानपणींच उठविला पाहिजे, असें त्याचें मत होतें. जे लोकांनीसुद्धां करावें असें त्याला वाटें, तें त्यानें स्वतः केलें असेल, हे उघडच आहे. परंतु मतांचें व भावनांचें शिक्षण देण्याचें काम जरी वडिलांनी चालू ठेवले असले, तरी मुलींना घरगुती व्यवसाय आलेच पाहिजेत, असा मातुश्रींचा कटाक्ष असे; आणि या दोहोंचा मेळ कसा घालावा हें डॉ. कार्पेंटर याला चांगलें कळलेलें होतें.
 १८२९ पर्यंत मेरी कार्पेंटर हिच्या जीवितांत विशेष कांहींच घडलें नाहीं. तेव्हांच्या मुली ज्याप्रमाणें वागत, त्याप्रमाणेंच तीहि वागे; आणि थोड्याफार फरकानें सरसकट मुलींच्या मेळांत सहज लोपून जाईल, अशीच तिची चालचलणूक असे. तिला एकविसावें वर्ष लागलें; आणि बापानें तिला पत्र लिहिलें कीं, "तुझ्या जीविताची घडी पुढें कशी बसत जाणार आहे, याची निश्चित कल्पना मला होत नाहीं; पण येशू ख्रिस्तानें जो धर्मदीप प्रज्वलित केला आहे, त्याचीं किरणेंच तुझ्या अंगावर पडावींत, आणि त्या तेजाच्या अनुरोधानें तूं आपलें भावी