लालबुंद असे. जो जो वय व्हावें, तों तों ही जास्तच तरुण होत चालली आहे, असें पोलिस लोक म्हणूं लागले. ते म्हणत, "ही बाई चेटकी आहे." त्यांनीं तिच्यावर सक्त पाहारा ठेवला; पण असल्याहि पाहाऱ्यांतून तिनें शेवटीं झुकांडी दिलीच, पण तिचें दैव खोटें हजारों मैल चालत जाऊन आतां रशियांतून बाहेर पडणार तोच, पोलिसांनी तिला पुन्हां गांठलें. त्यांनीं तिला सायबेरियाच्या अगदीं उत्तर टोकाकडे फेकून दिलें. येथल्या समुद्राच्या खाडींत आपण गोठून मरून जाणार, असें कॅथरीनला स्वतःलासुद्धां वाटू लागलें. चार-पांच वर्षे गेली; आणि एके दिवशीं शुभवर्तमान आलें कीं, "रशिया स्वतंत्र झाला आहे; क्रान्ति यशस्वी झाली आहे; झारशाही समूळ उपटून पडली आहे!" आपलें स्वप्न खरें ठरलेलें पाहून ही पराक्रमी बाई आनंदानें बेहोष होऊन गेली आणि मास्कोला परत आली.
परत आल्यावर क्रान्तीचा एकंदर रोख आपल्याला हवा आहे तसा चालूं नाहीं, हे पाहून तिला वाईट वाटलें. जर्मनांशीं क्रान्तिकारकांनीं तहनामा करावा, हें तिला बिलकुल पसंत नव्हतें. मतभेद होऊन ती शेवटीं झेकोस्लोव्हाकियांत जाऊन राहिली. तथापि साऱ्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, तशाच नेहमीं घडत नाहींत, हा मानवी जीवनांतला उंच विचार तिनें प्रमाण मानला. पण शहात्तराव्या वर्षी या बाईनें प्राग येथें एक नवीन शाळा काढली; आणि आपल्याला पसंत असलेल्या क्रांतितत्त्वांचें शिक्षण चालू ठेवलें. चौदा वर्षे म्हणजे नव्वद वर्षांची होईपर्यंत हा उद्योग तिनें चालू ठेवला; आणि जीवितांत कृतकृत्य होऊन या क्रांतिकारक वृद्धेनें जगाला शेवटचा प्रणाम केला.
● ● ●