Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
कर्तबगार स्त्रिया
 


 बरेच दिवस गेल्यावर तेथलीं तीन तरणीं शिकाऊ पोरें बरोबर घेऊन कॅथरीननें या गांवांतून पळ काढला. सायबेरिया म्हणजे एक अवाढव्य देश आहे; आणि इतक्या वर्षापूर्वी तर पाऊलवाटांशिवाय दुसऱ्या वाटाहि फारशा नसत. अर्थात् वाटाड्याशिवाय वाटचाल करणें सर्वथा अशक्य होतें. कॅथरीनचा वाटाड्या वाट चुकला आणि ही सारी मंडळी अचानक पोलिसांच्या हातीं लागली!
 कॅथरीनला पुन्हां खाणींतल्या सक्त मजुरीची शिक्षा झाली. येथें केवळ कदान्नावर रहावें लागे. पण कॅथरीनची मूळची शरीर प्रकृति दणकट आणि तिची मनःप्रकृति तर अधिकच बळकट; त्यामुळे ती त्यांतूनहि बचावून गेली. एक अमेरिकन बातमीदार तिला भेटण्यासाठीं मुद्दाम गेला होता. त्याला ती कठोर निग्रहानें म्हणाली, "आम्ही मरून जाऊं; आमचीं मुलें बंधमुक्त होतील; कदाचित् मुलेंहि मरून जातील; पण नातवंडें तरी मुक्त होतील!" तिचा हा दुर्दम्य आशावाद पाहून बातमीदार चकितच होऊन गेला.
 १८९६ मध्ये, सायबेरियांतून तिची मुक्तता झाली. परत आल्यावर ती आपल्या जुन्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेटली. त्यांचें तें सुखाचें जीवन पाहून तिला मोठा विस्मय वाटला. परंतु रशिया मुक्त होईपर्यंत ती गप्प बसणार नव्हती. ती पुन्हा क्रांतिकारकांच्या टोळीला जाऊन मिळाली. शेतकऱ्याचा वेष घेऊन तिनें कामाला सुरवात केली. पोलिसांना हुलकावण्या देण्यांत ती आतां पटाईत झाली होती. केव्हां शेतकऱ्यासारखें दिसावें; केव्हां स्वैपाकिणीचा वेष घ्यावा, असें करीत तिनें कांहीं दिवस घालविलें. आणि मग ती अमेरिकेत गेली. तेथील लोंकांनीं तिचा जयजयकारच केला. ती सभास्थानीं येतांच सारे श्रोते तटकन् उभे राहात; हातरुमाल उडवून ते तिच्या नांवानें आरोळ्या मारीत; आणि "रशियांतील क्रांतीची जननी" म्हणून तिचा गौरव करीत. ते तिला म्हणू लागले कीं, "आतां तुम्ही रशियांत परत जाऊं नका." परंतु या करारी बाईनें हा त्यांचा प्रेमळ आग्रह बाजूला सारला; आणि ती स्वदेशाला परत गेली.
 १९१२ साली तिच्यावर पुन्हा खटला झाला; आणि तिला जन्मठेपेची शिक्षा झाली. पुन्हा शिक्षा, पुन्हा सायबेरिया, असें चाललें होतें. पोलिसांना वाटत होतें कीं, या प्रदेशांतील दोन तीन हिंवाळे हिनें खाल्ले, म्हणजे ही मरून जाईल. पण त्यांचा अदमास अगदीं चुकला. या बाईचें शरीर लोखंडाचें बनलें होतें. ती आतां सत्तरीला आलेली होती. पण तिचें अंग चांगलें गुबगुबीत आणि चेहरा