पोलिसांनीं कॅथरीनला पकडलें, तेव्हां ती म्हणाली, 'मी दुसरें तिसरें कांहीं करीत नसून या अज्ञ लोकांना विचार करावयास शिकवीत आहे.' यावर ते पोलिस म्हणाले, 'थांब, तुला विचार करावयाला छान जागा देतों.' त्यांनीं तिला एका जेलखान्यांत भिरकावून दिलें. तेथें डोळ्यांत बोट घातलें, तरी दिसत नव्हतें; उंदीर-घुशींचा सुळसुळाट चालला होता; आणि आंतल्या लोकांनीं केलेल्या घाणीवर आंत येणारांचे पाय सरासर घसरत होते. सारी रात्र कॅथरीन् हिनें उभे राहूनच काढली. यानंतर या तुरुंगांतून त्या तुरुगांत तिची रवानगी होत राहिली; आणि निरनिराळ्या जेलखान्यांची चव तिला आणून दिल्यानंतर त्यांनी तिला सायबेरियांत हद्दपारीवर पाठवून दिलें. पांच वर्षेपर्यंत खाणी खणण्याचें सक्तमजुरीचें काम तिला देण्यांत आलें. ही मुदत संपल्यानंतर पुढे कित्येक वर्षे सायबेरियाच्या रेताडांतच तिनें राहावें, अशी सजा देण्यांत आली.
पोलिसांनी तिला एका गाडीत बसविलें, दोन्हीकडें दोन गलेलट्ठ शिपाई बसविले होते. आठवड्यामागें आठवडा ही गाडी खडकाळ सडकांवरून धक्के खात चालली होती. कोठेंहि दहा मिनिटांपेक्षां जास्त मुक्काम त्यांनी होऊ दिला नाहीं. झोपेचें नांव नाहीं. आणि ते गलेलठ्ठ आसामी तर तिच्याकडे सारखे टक लावून बसले होते. कोठें एकादी रात्र मुक्काम करावा, तर मुक्कामाची जागा म्हणजे उंदीर-घुशींचें पेव फुटलें आहे, असे वाटत असे. अशा प्रकारची ही दुर्धर आपत्ति या झारबाबांच्या काळांत दहा लक्ष लोकांच्या नशिबी आली होती.
जातां जातां शेवटीं ही टोळी कारा गांवच्या खाणीजवळ येऊन पोंचली. येथें सक्तमजुरी तर होतीच, पण कांहीं कांहीं वेळां ऐद्यासारखे बसून राहण्याची शिक्षा होत असे. थोडेसे दिवस येथे गेल्यावर उत्तर ध्रुव प्रदेशांतील बार्गुझिन् या गांवाकडे तिची रवानगी करण्यांत आली. हा गांव जवळ जवळ बर्फात गाडलेलाच असे. तेथें पोंचेपर्यंत कॅथरीन् हिला एक हजार मैल पायीं चालावें लागलें. सारे कैदी लोक खालीं माना घालून दिवसानुदिवस चालले होते. हुं कां चूं करण्याची सोय नव्हती. वाटेनें उजव्या डाव्या हाताला पहावें, तर असल्या हालांत मरून गेलेल्या कैद्यांच्या प्रेतांचे सापळे दोन्ही बाजूला भेडसावीत असत. तेथें पोंचल्यावर कांहीं स्थानिक लोकांच्या मुलांना शिकवावें, असें कॅथरीननें ठरविलें. पण तिला जरब देण्यांत आली कीं, झारच्या राज्यांत शिकविणें-बिकवणें सारें बंद आहे.
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/७१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कॅथरीन् ब्रेशकोव्स्की
६७