Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कॅथरीन् ब्रेशकोव्स्की
६१
 


ण्यांची बडदास्त ठेवण्यांत नेहमीं गुंतलेल्या असत. आज अमक्याच्या वाड्यावर, नाच आहे, उद्यां तमक्याच्या बागेत मेजवानी आहे, परवां झारच्या दरबारी कलावन्तांचा सन्मान आहे, अशीं बोलावणीं त्यांना येत असत. अर्थात् परस्परांच्या गांठीभेटी, पानसुपाऱ्या, नाचरंग, आणि गुजगोष्टी, यांत त्या पोरींचा सारा वेळ नाहींसा होई. परन्तु कॅथरीन ही अशा प्रकारांपासून पहिल्यापासूनच अलिप्त राहात असे. तिला हे श्रीमंतीचे ढंग आणि चोचले कधीं रुचलेच नाहीत. सुदैवानें तिला फ्रेंच आणि जर्मन या भाषा अवगत झालेल्या होत्या; आणि त्यांतील श्रेष्ठ दर्जाचें वाङमय तिच्या परिचयाचें झालें होतें. व्हाल्टेअर, रूसो आणि डिडिरो या क्रांतिकारकांचीं वाङमयें तिला फारच आवडत; आणि फ्रेंच राज्यक्रांतीवरचे ग्रंथ तर तिनें मुखोद्गत केलेले होते. १८४८ मध्ये जर्मनींत झालेली क्रान्ति तिनें चांगली अभ्यासिली होती. तिचें मन रशियांतून बाहेर पडून युरोपच्या क्रान्तिमय जीवनांत अव्याहत संचरूं लागलें. रशियांत क्रान्ति झाली नव्हती; परंतु क्रांति व्हावी अशी परिस्थिति मात्र होती. बाहेरच्या युरोपांतील लोकांनीं आपल्या दास्याचे पाश तटातट तोडलेले पाहून तिला मोठा विस्मय वाटे. हेंच धैर्य आपल्या देशांतील लोक केव्हां दाखवितील, अशी चुटपूट तिला लागून राहिली.
 क्रांति शब्दानें, अचानक झालेली उलाढाल किंवा एकाएकीं झालेली घडामोड सूचित होते. परंतु ही कल्पना असावी तितकी बरोबर नाही. क्रांतीच्या कल्पनांचा उद्भव, त्यांची परिणति आणि त्यांचा स्फोट कांहीं वेळ खातात. या साऱ्या गोष्टी विजेच्या धक्क्याप्रमाणें अचानक घडून येत नाहीत. कॅथरीननें ओळखलें कीं, बाहेरील देशांतील लोक दास्यमुक्त झाले आहेत, तसे आपल्याही देशांतील होतील; परंतु त्यांच्या विमोचनाची तयारी कोणीतरी केलीच पाहिजे. या लोकांच्या मनांत स्वातंत्र्याच्या कल्पना रुजत घातल्या पाहिजेत. त्या तेथें वाढल्या, म्हणजे केव्हां ना केव्हांतरी सफल होतीलच. सुटकेच्या कल्पना रुजत घालावयाच्या, तर लोकांच्या मनावरचें अज्ञानाचे किटण खरडून काढावयास हवें, आणि या कामाला शाळा हें फार उत्तम साधन आहे.
 म्हणून कॅथरीन् ब्रेशकोवस्की हिनें शेतांत राबणारांसाठी एक शाळा सुरू केली. हे शेतकरी अतिशय अडाणी होते. ते लाचार बनलेले असत. आपला जमिनीचा लहानसा टवका, त्या जमिनीवरचा गोठा, गांवठणांतील एकादें कच्च्या विटांचें खोपट, आणि फार झालें तर एखादी बैलजोडी याच्या पलिकडे त्यांच्या मनाचा