Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
कर्तबगार स्त्रिया
 


जाई. आपले आईबाप मात्र आपल्या लोकांना ममतेनें वागवतात, हें पाहून तिला फार आनंद वाटे. लोकांना मारावयास चटावलेले ते मग्रूर सरदार कॅथरीनच्या बापाला म्हणत, 'तुमचें घर म्हणजे प्रजासत्ताक राज्य आहे.' या त्यांच्या थट्टेचा अर्थ एवढाच होता कीं, हा भला गृहस्थ आपल्या लोकांना चांगल्या तऱ्हेनें वागवत असे.
 कॅथरीन् हिने आपल्या श्रीमंतीचा डौल लहानपणापासूनच टाकून दिला. गरिबांच्या मुलांतच जाऊन खेळावें, त्यांच्याशीं गोष्टी बोलत बसावें, असा तिचा शिरस्ता असे. एकादे वेळीं आपल्या सोबत्याच्या अंगांत जर कुडतें नसलें, तर आपल्या अंगांतलें काढून त्याला द्यावें, असा प्रकार ती कितीदां तरी करी. आईनें म्हणावें, "तूं आपले कोट सारखे देऊं लागलीस, तर कसें बरें चालेल?" यावर कॅथरीन् तिला उत्तर करी, "आई, बायबलांत सांगितलें आहे ना कीं, तुमच्यापाशीं जर दोन कोट असले, तर त्यांतला एक उघड्यानें हिंडणाऱ्या माणसाला देऊन टाका!" यावरून दिसून येईल कीं, कॅथरीनच्या मनाची ओढ जे कोणी रंजले-गांजले असतील, त्यांच्या बाजूला असे.
 कॅथरीनला वाटे कीं, साऱ्या गरीब लोकांना आपल्यासारखेंच सुखी करावें, त्यांना चांगलें खायला मिळावें, त्यांना अंगभर चांगलें वस्त्र असावें, आणि त्यांना त्यांचें स्वतःचें घर असावें. पण हें सारें कसें होणार होतें? कॅथरीननें ऐकलें होतें. कीं, अमेरिकेतील कॅलिफोर्निया देशांत सोन्याच्या खाणी आहेत, एल्-डो-रॅडो इकडेही नदीच्या वाळवंटांत सोन्याचे गोळेच्या गोळे सांपडतात; असें जर आहे, तर आपण अमेरिकेत जावें, खाणींतून खूप सोनें खणून काढावें, आणि तें घरीं आणून गरिबांना अन्न, वस्त्र, आणि निवारा प्राप्त करून द्यावा, असें तिला वाहूं लागलें. कॅलिफोर्निया किंवा एल-डो-रॅडो इकडे सोनें केवळ फुकट सांपडतें, फक्त 'खणून काढावें लागतें, किंवा गोळा करावें लागतें, असा तिचा समज होता. तिची ही कल्पन बालपणची अर्थातच फोल ठरली आणि लवकरच तिला कळून चुकलें, कीं अशा रीतीनें सोनें गोळा करून आणणें आणि त्याच्या बळावर गरिबांचे हाल नाहींसें करणें, गुलामांना मुक्त करणें, हें सर्वथा अशक्य आहे. परंतु लहानपणचीं तिचीं बरींच वर्षे या मनोराज्यांतच गेली.
 सरदार, सरंजामदार, बडे उत्पन्नदार, राजे-रजवाडे, आणि झारच्या दरबारांतील मानकरी यांच्या लेकी-सुना नटण्या-मुरडण्यांत आणि घरीं आलेल्या श्रीमंत पाहु