| हिनेंच आपल्या हालांनी क्रान्तीचें बीज रुजविलें! |
कॅथरीन् ब्रेशकोव्स्की : ६ :
कॅथरीन् ब्रेशकोव्स्की या रशियन् क्रान्तीच्या जननीचें मूळचें नांव एक ओळभर लांब भरेल! "एकाटेरिना कॉन्स्टॅन्टिनोव्हा ब्रेशकोव्स्काया" एवढे लांबलचक नांव तिचें होतें. या स्त्रीच्या पोटीं रशियन राज्यक्रांति जन्माला आली, असें म्हणणें अतिशयोक्तीचें होईल; कारण तिला एकदां कां हा गौरव अर्पण केला, म्हणजे लेनिन् इत्यादि जबरदस्त कर्तबगार लोकांना कोणचे श्रेय शिल्लक उरतें असा प्रश्न क्रान्तीच्या अभिमान्यांना पडेल. तथापि ब्रेशकोव्स्की ही स्त्री असूनहि तिनें क्रान्तिकल्पना रुजत घालण्यासाठीं, आणि त्या व्यवहारांत आणण्यासाठीं सोसलेल्या वेदना लक्षांत घेतल्या, म्हणजे तिच्या चाहत्यांनीं क्रान्तीचं मातृपद तिला अर्पण करावें, हें पुरुषांच्या स्त्री-दाक्षिण्याला शोभेसेंच आहे. तसेंच हिला परित्यक्तपण प्राप्त झालें, हा दावा सर्वच क्रान्तिकारक मान्य करतील, अशी शाश्वति देववत नाहीं. तथापि अलंकारांच्या पोटीं सर्व कांहीं खपून जातें हा न्याय आपण मानला पाहिजे; आणि या स्त्रीला 'क्रान्तीची परित्यक्त जननी' हें नांव खुषीनें दिलें पाहिजे. आपण पुष्कळदां म्हणतों कीं, प्रतिकार-बुद्धींतून क्रान्तीचीं बीजें अंकुरित होतात; आणि ज्यांचे हाल चाललेले असतात, त्यांतूनच वीर पुरुष जन्माला येतात. पण हे नेहमींच खरें नसतें. धर्मकारणांत ज्याप्रमाणें उपाध्यायवर्गातूनच कित्येक सुधारक निपजले आहेत, त्याप्रमाणेंच समाजकारणांतही सरंजामशाही भोगणाऱ्या वर्गातून गरिबांचा कैवार घेणारे आणि स्वकीयांवर चढाई करून जाणारे क्रान्तिवीर निघाले आहेत. कॅथरीन ब्रेशकोवस्की हिचे वाडवडील आणि आजोळचें घराणें ही सरदार-दरकदार अशा वर्गातीलच होतें. दोन्ही घरीं सर्व तऱ्हेची सुबत्ता होती. पण इतर सरदार घराण्यांहून या लोकांच्या मनाची ठेवण कांहींशीं निराळी बनली होती. तेव्हांची रशियन सरदार घराणीं उतून मातून गेलेली असत. सुखलालसेपलिकडे दुसरा मनोधर्म त्यांना उरलेला नव्हता; आणि आपण हे भोग कशाच्या बळावर भोगतो, यांची वर्दीही त्यांना नसे. पैसा मातीमोल होता, तो उधळत रहावें, एव