Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जेन अदाम्स्
५७
 


पण आतां त्याला नवें बळ तिनें आणले. लवकरच इतर देशांतहि अशा तऱ्हेच्या संघटना उभ्या राहिल्या; आणि त्या सर्वांचें मिळून एक जाळें बनले, जेनचा महिमा एवढा मोठा, कीं या सार्वदेशीय संघटनेचें अध्यक्षपद जेनला देण्यांत आलें. अशा रीतीनें जेन एक जगप्रसिद्ध स्त्री बनली.
 तिनें याच वेळीं लोकांना बजावलें कीं, 'लवकरच हुकुमशाह्या प्रस्थापित होतील; आणि शिरजोर हुकूमशहा तमाम लोकांच्या अन्नांत माती कालवतील.' तिचा शांतिघोष जगभर एवढा गाजला, कीं १९३१ सालीं निकोलस मूरे बटलर याला व जेनला मिळून शांतीचें नोबेल प्राइज मिळाले. या बक्षिसाचे मिळालेले सुमारे पाऊण लक्ष रुपये तिनें स्त्रियांच्या आंतरराष्ट्रीय संघाला देऊन टाकले; आणि देतांना सांगितलें कीं, 'देशोदेशींच्या अर्भकांना तुम्ही जवळ घ्या; आणि परस्परांची मनोगतें समजावून घेऊन विश्वांत शांति प्रस्थापित करा.'
 १९३५ सालीं जेनच्या कुशींत एकाएकीं चमका निघू लागल्या. शस्त्रक्रिया केली पाहिजे, असें डॉक्टर म्हणू लागले. शस्त्रक्रिया झाली, तों आंतून एक मोठें थोरलें गळू निघालें. हे कॅन्सरचेंच दुखणें असले पाहिजे. चारच दिवसांनीं या जगद्विख्यात स्त्रीचा अन्त झाला. पन्नास हजार लोक तिच्या प्रेतयात्रेला गेले; आणि या शान्तिदेवीचें नांव घेऊन ते सारे ओक्साबोक्शी रडले!

● ● ●