कोणाचीहि असू द्या. त्यांच्या ठिकाणीं देवानें चांगल्या भावनांचें आणि सामर्थ्याचें बीज खोचलेलेंच असतें. हीं बीजें वाढवणें, हाच खरा खरा थोर धर्म होय.' निरनिराळ्या जातीची हजारों मुलें तिच्या त्या मंदिरांच्या प्राकारांत जमूं लागली; आणि नवल हें कीं, तिनें लावलेल्या या नव्या वळणामुळे गटारांतून बाहेर आलेली शेकडोंच्या शेकडों मुलें समाजांत मानाचे धंदे करूं लागलीं. त्यांचें तें वैभव पाहून जेन वात्सल्याने गहिंवरून जाई. येथपर्यंत जेनला मोठेंच यश मिळत गेलें.
तिला वाटें कीं, सर्वांनीं सुखासमाधानानें वागावें; एकमेकांची मनोगतें समजावून घेऊन, त्यांनीं परस्परांशीं जमवून घ्यावें; आणि एकमेकांच्या अडीअडचणींचा परिहार करावा. हे व्हावयाचें, तर देशांत शांति नांदली पाहिजे; आणि ती नांदावयाची, तर जसें माणसां-माणसांनी एकमेकांत, तसें राष्ट्रा-राष्ट्रांनी परस्परांत समंजसपणानें आणि सलोख्यानें वागावें. युद्ध म्हटले, की तिच्या अंगावर कांटा उभा राही. पण दुर्देव असें कीं, १९१४ सालीं पहिलें महायुद्ध सुरूं झालें. जगांतील वारे कसे वहात आहेत हें तिनें पाहिलेंच होतें. म्हणून ती सर्व राष्ट्रांना व विशेषतः अमेरिकेला असें सांगू लागली कीं, 'तुम्ही वर्दळींवर येऊं नका; मतभेद तडजोडीनें मिटवा. हातांत शस्त्रे घेऊं नका; आणि बायका-मुलांच्या जीविताचा उन्हाळा करूं नका." युद्धाच्या गर्जनांनीं भांबावलेले लोक म्हणूं लागले कीं, 'ही बाई जर्मनीच्या बाजूची आहे; जर्मनांनी पुंडाई करावी, आणि आम्हीं मात्र गप्प बसावें, असें हिला वाटतें.' तिनें प्रत्युत्तर केलें कीं, 'जर्मनांनींही पुंडाई करूं नये, व तुम्हींहि शस्त्रे धारण करू नये.' तथापि युद्धाचा डंका येवढ्या जोरानें वाजू लागला, कीं तिच्या शांतिपाठाच्या मंजुळ गाण्याचे स्वर कोणाला ऐकूंहि जाईनात. पण तिनें आपला हट्ट सोडला नाहीं. शांतीचें निशाण हातीं धरून ती एकटी बाजूला उभी राहिली; आणि म्हणाली, 'माझी ही घोषणा तुम्हांला इतक्यांत पटावयाची नाहीं.' भ्रान्त बनलेल्या लोकांनीं तिला हिडिस- फिडीस केलें, देशद्रोही म्हटलें, आणि जणूं कांहीं तिला वाळीत टाकले; पण ही साध्वी स्त्री आपल्या तत्त्वाला जागली; आणि विश्वशांतीची घोषणा करीत एकाकी उभी राहिली.
युद्ध संपलें; आणि शेकडों प्रपंच कसे उजाड झाले आहेत, हें लोकांना प्रत्यक्ष दिसूं लागलें. स्त्रियांच्या जीविताची तर दाणादाण झाली होती. या गोष्टीचा फायदा घेऊन तिनें 'अमेरिकन स्त्रियांचा शांतिपक्ष' जोरानें पुढें आणला. हा पक्ष पूर्वी होताच.
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/६०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
कर्तबगार स्त्रिया