सुधारलेलें आहे, अशी फुशारकी मारायची, आणि दुसरीकडे सात सात वर्षांच्या कोंवळ्या पोरांना कारखान्यांत, वखारींत, कामाखालीं बेजार करावयाचें, अशी अमेरिकन नीति होती. कांहीं कांहीं ठिकाणीं सात वर्षांच्या मुलांना चवदा तास राबवून घेत असत. लेखकांनी या वर्णनाच्या कामी अतिशयोक्ति केली आहे असें धरून चाललें, तरी कष्टकरी मुलांना फार उपद्रव होत असे, हा सत्याचा सांका शिल्लकच रहातो. यंत्रादिकाचे धक्के लागून कित्येक मुले जन्माचीं अधू होत. जेन हिनें मातृपदाचा स्वीकार केव्हां केलाच नाहीं. पण या मुलांचे हाल पाहून स्रीजातीला सहज अशी जी वात्सल्यबुद्धि ती तिच्या ठिकाणीं उत्कटत्वानें प्रकट झाली; आणि नेहमींच्या मनोधर्माप्रमाणे ती एकदम कामाला लागली.
'लहान मुलांचे कष्ट' या विषयाचें तिनें संशोधनच सुरू केलें. होतां होता, तिच्यापाशीं इतकी आंखबंद माहिती जमा झाली, कीं या बाबतींतील तिचीं अनुमानें अचूक होऊं लागलीं; आणि तिनें केलेलीं विधानें प्रमाणभूत बनूं लागली. इलिनॉय परगाण्यांतील स्त्रियांच्या आणि कामकऱ्यांच्या संघटनांशी तिनें आपला संबंध जोडला; आणि त्यांच्या सहकार्यानें मोठी चळवळ करून १९०३ साली लहान मुलांना न राबवण्याच्या कामी सरकारांतून एक कायदा करून घेतला. या कायद्यानें तिनं काय साधलें, तें लक्षांत घेतलें, म्हणजे मूळचा सामाजिक रोग किती दुर्धर होता याची कल्पना येते. कायदा एवढाच झाला कीं, 'सोळा वर्षांपेक्षां लहान वयाच्या मुलांना सकाळीं साताच्या पूर्वी आणि संध्याकाळीं साताच्या नंतर काम सांगूं नये.' यावरून इतकेंच दिसून येतें कीं, सोळा वर्षांच्या खालच्या मुलांना हे लोक दिवसभर राबवीत असत! जेननें हा मोठाच विजय मिळवला. कारण या प्रश्नाकडे देशांतील विचारवंतांचें मन तिनें ओढून घेतलें; आणि अनेक परगण्यांत या कायद्याचें अनुकरण होऊं लागलें.
जेन येवढ्यावरच थांबली नाहीं. तिला वाटें कीं, देशांतील पोरें वांया जात आहेत. शेकडों पोरें रस्त्याच्या गटारांत खेळत असत. यांना जास्त स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणांत नेलें आणि खेळू दिलें, तर हीच पुढें फार चांगलीं माणसें होतील, असा कयास तिनें बांधला; आणि 'गांवांतील लहान मुलांचीं क्रीडांगणें' हा नवा उपक्रम तिनें सुरू केला. शिकॅगो शहरांत लवकरच कितीतरी क्रीडांगणे निघाली; आणि तेथें सर्व दर्जाचीं मुलें आनंदाने खेळू लागली. होतां होतां ही क्रीडांगणांची चळवळ सर्व अमेरिकेभर पसरली. ती म्हणे कीं, 'मुलें
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/५९
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जेन अदाम्स्
५५