Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जेन अदाम्स्
५३
 


साधनें ठेवली. एतावता, येथें जाऊन बसावें असें कोणालाहि वाटावें, इतपत आकर्षकता या मंदिराला तिनें प्राप्त करून दिली. तेथें जावें असें गरिबांनाहि वाटावें, श्रीमंतांनाहि वाटावें, स्त्रियांना वाटावें, पुरुषांनाहि वाटावें, आपापल्या ओळखीच्या वस्तू आणि संस्कृतीच्या खुणा पाहून सर्व जातींच्या लोकांना तेथें जावेसे वाटावें, अशी योजना या कल्पक स्त्रीनें केली; आणि मग वृत्तपत्रांतून घोषणा केली कीं, "या मंदिरांत सर्व लोकांनीं यावें; येथें कसलाहि भेदभाव नाहीं; येथे सर्वानाच आपापल्या संस्कृतीची ओळख पटेल; येथें सर्वांनीं यावें, खावें, प्यावें, गोष्टी बोलाव्या, एकमेकांना आपलीं सुखदुःखे सांगावीं, आणि स्नेहसंबंध जुळवावे."
 पहिल्या- पहिल्यानें लोक थोडेसे बिचकलेच. त्यांना वाटलें कीं, यांत बाईचा कांहींतरी डाव असावा. गरिबांना वाटलें कीं, तेथें श्रीमंत येणार, तर आपण कसे जावें; आणि श्रीमंतांना वाटलें कीं तेथें जमलेल्या भिकाऱ्यांत आपण जाऊन कसें बसायचें? पण 'काय आहे तें बघू तर खरें' असें म्हणणारे कांहीं लोक निघालेच. जेननें त्यांचें चांगलें स्वागत केलें. खाद्यपेयांच्या, संभाषणांच्या, विश्रान्तीच्या तऱ्हा तिनें अशा ठेवल्या, कीं वादाला कोठें जागाच उत्पन्न होऊं नये; उलट परस्परांत असलेल्या चांगल्या गुणांचा व भावनांचा वापर होऊन त्यांना एकमेकांची संगति सुखाची वाटावी.
 थोडेसे दिवस गेले; आणि या मंदिरांत येऊन गेलेले लोक भोवतालच्या लोकांना मंदिराचें स्वारस्य मनोभावें सांगू लागलें. अर्थताच मंदिरांत येणाऱ्या लोकांची संख्या भराभर वाढू लागली. पण हें मंदिर म्हणजे केवळ करमणुकीचें ठिकाण होऊं देतां कामा नये, असा जेनचा कटाक्ष होता. ती कॉलेजांत होती; तेव्हांपासूनच मनुष्यमात्राची सेवा हा तिच्या मनाचा धर्मच बनलेला होता; आणि युरोपांतील भ्रमन्तीनें तो दृढ झालेला होता. या सेवेचा उपक्रम या मंदिरांत बाईनें सुरू केला.
 एकदां एक ग्रीक बाई घाबऱ्या घाबऱ्या मंदिरांत आली; आणि म्हणाली, 'रस्त्यांत माझें मूल चेंगरलें आहे, नवरा कामाला मेला आहे, आणि औषधाला माझ्यापाशीं कपर्दिकहि नाहीं. मी आतां काय करूं?' जेननें तत्काळ एका डॉक्टरला बोलावून आणलें. ताबडतोब औषधोपचार होऊन, त्या बाईचें