Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
कर्तबगार स्त्रिया
 


एकाच वर्णाचे, आणि जवळ जवळ एकाच संस्कृतीचे होते. त्यांच्या भाषा निराळ्या आणि त्यांचे देश निराळें इतकेंच काय तें. अशा लोकांनीं कां भांडावें, आणि हे असेच भांडत राहिले, तर अमेरिकेत लोकशाही कशी प्रस्थापित होईल, हा विचार जेनच्या मनांत अतिशय प्रबळ झाला. या सर्वांना एकत्र आणलें पाहिजे, त्यांच्यांतील साम्यें त्यांना दाखवून देऊन त्यांचा बंधुभाव जागृत केला पाहिजे, करावा. यासाठीं जेननें एकदम कामाला आरंभ केला. या कामाचा विस्तार होतां होतां अमेरिकेतील लोकशाही सध्यांचें रूप पावली.
 युरोपांतून आलेल्या किंवा आफ्रिकेंतून आणलेल्या हलक्या प्रतीच्या लोकांचा उद्धार वरिष्ठ लोकांनी करावा, ही जेनच्या मनाची भूमिकाच नव्हती. तिला असें वाटे कीं, या प्रत्येक जातीच्या लोकांत कांहींना कांहीं तरी चांगले गुण असलेच पाहिजेत. कोणीहि लोक असे नसतात कीं, ज्यांच्यामध्यें कल्पना, भावना, उपजतबुद्धि, प्रवृत्ति यांचा यत्किंचितहि पोष झालेला नाहीं. जें करावयास हवें तें हें कीं, या पोसलेल्या गुणांची ओळख निरनिराळ्या जातींच्या लोकांना त्या त्या जातींतील जाणत्या लोकांनी करून द्यावयास हवी; परंतु अमेरिकेत त्या वेळीं घडत नव्हतें तें हें कीं या भिन्न भिन्न जातीच्या लोकांना परस्परांच्या मनोगुणांची माहिती व्हावी, आणि त्यामुळे त्यांनी एकमेकांशीं तुसडपणाने वागूं नये. जेननें असें ठरवलें कीं, यांची एकमेकांशी चांगली ओळख करून द्यावी. तिचें हें अवलोकन अगदी बरोबर होतें. आफ्रिकेंतून आलेले अगदींच अडाणी निग्रो लोक सोडले, तरी केवळ योग्य त्या परिचयाच्या अभाव इटॅलियन, ज्यू, जर्मन, फ्रेंच अशांसारखे लोकसुद्धां एकमेकांशीं सामरस्यानें वागत नसत. त्यांच्या मनाचा एक रांधाच होईना. हा करण्याची जर व्यवस्था झाली, तर अमेरिकन लोकांतील फुटीरपणा नाहींसा होईल, त्या सर्वांची मिळून एक सलग लोकशाही निर्माण होईल, हें जेनचें सामाजिक तत्त्वज्ञान अगदीं बरोबर होतें.
 या तत्त्वज्ञानाला मूर्त रूप आणण्यासाठी, तिनें 'हल हाऊस' या नावाचे एक मंदिर उभे केलें. हें मंदिर मोठें सुंदर असुन त्याला अनेक दालनें होतीं; आणि तीं जरी श्रीमंती थाटानें श्रृंगारलेली नसली, तरी त्यांत सर्व प्रकारच्या सुखसोयी तिनें केलेल्या होत्या. नुसत्याच सुखसोयी असत्या, तर ती स्टेशनची एक वेटिंग रूम झाली असती. पण तिनें तेथें चांगलीं चांगलीं पुस्तकें ठेवलीं, निरनिराळ्या देखाव्यांची चित्रे भिंतीला लावली, नकाशे टांगले, टेबलांवर करमणुकीचीं