Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिनें गरिबांना अन् श्रीमंतांना एकत्र आणलें!


जेन अदाम्स् : ५:


 जेन अदाम्स या अमेरिकन स्त्रीचें चरित्र एखाद्या साधु पुरुषाला शोभण्यासारखेच झालें. हें साधुत्व समकालीन लोकांनीं तिला अर्पण केलें नाहीं. परंतु, भूतदया आणि शांति यांचें राज्य पृथ्वीवर जो जो जास्त होत जाईल, तों तों या राज्याचे मागचे मागचे संस्थापक कोण, याचा शोध लोक करूं लागतील; आणि मग जेन अदाम्स या स्त्रीच्या चरित्राला त्याचा खरा महिमा प्राप्त होईल. पुष्कळ तत्त्ववेत्ते, कर्ते आणि विचारी लोक योग्य काळाच्या आधीं जन्माला आलेले असतात. त्यांचीं ज्ञानें, कृत्ये किंवा विचार हीं समकालीन लोकांना नीटशीं आकलतां येत नाहीत. शें-दीडशे वर्षे गेलीं, म्हणजे त्यांचे मर्म लोकांना समजूं लागतें; आणि या लोकांचे नातू पणतू त्यांचा गौरव करूं लागतात. जेन अदाम्स या बाईचें जरी तंतोतंत असें झाले नसले, तरी सामान्यपणे पाहतां, त्या थोड्या आणखी उशिरा जन्मास आल्या असत्या तर बरे झालें असतें, असें वाटतें!
 अमेरिकेच्या इलिनॉय परगाण्यांत सेदरव्हिली येथें एक बडा गिरणीवाला होता. हा क्वेकर पंथीय असून कांहींशा इतमामानें वागणारा असे. आपल्या धंद्यांत सचोटीनें वागावें; आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांवर पूर्ण विश्वास ठेवून मनाला कसलाहि कहार करून घेऊं नये, असें त्याचें धोरण असें. त्यानें आपल्या घराला कुठें कुलूप सुद्धां लावलें नाहीं; इतका त्याचा गांवांतल्या लोकांवर विश्वास असे. याची बायको आधींच मरून गेली होती; आणि दोन वर्षांची छोटी जेन सारखी त्याच्या मागें मागें करीत असे. आई आणि बाप हीं दोन्हीं नातीं जेनच्या दृष्टीनें त्याच्या ठिकाणी एकवटलेली होती; आणि म्हणून प्रत्येक गोष्टींत बाबांच्या तोंडाकडे पहावें, आणि ते करतील तसें करावें, असा जेनचा स्वभावच बनला होता.
 हा गिरणीवाला मोठा सच्चा माणूस असून वचनाचा धड असे. अर्थातच एकाद्या वेळीं जेन खोटें बोलून गेली, तर तिला चैन पडेनासें होई; आणि मग हलकेच बाबांच्या उशाशीं जाऊन ती त्यांच्या कानांत सांगे कीं, "मी मघाशीं