पेटिका ठेवली होती, असें पुढें दिसून आलें. तो तिकडे गेल्यावर त्याला सर्व तऱ्हेचीं सुखसाधनें उपलब्ध व्हावीत, म्हणून बर्डेट हिनें वाटले तितका पैसा खर्च केला. त्याला पत्र पोचणे अवघड होत आहे, असें दिसतांच मोरक्को देशांतील एका हुन्नरी व्यापाऱ्याला तिनें हाताशी धरलें. वेषान्तराची विद्या याला चांगली साधली होती. तो सुदानी माणसासारखा दिसूं लागला. गॉर्डन याला लिहिलेली आपली खाजगीं पत्रें एका पेटींत घालून बर्डेट हिने या व्यापाऱ्याच्या हवाली केली; आणि तीं त्यानें सुदान प्रांतांत जाऊन गॉर्डन याला पोंचतीं केलीं. आपल्यासंबंधीं बाईच्या मनांत वागत असलेला हा आत्मभाव पाहून सेनापति गॉर्डन याला निःसंशय धन्यता वाटली असावी.
१८८१ साली बर्डेट बाईनें आपल्या एका कृत्यानें साऱ्या जगाला आश्चर्याचा धक्काच दिला. या वेळीं बाईंना सदुसष्ट वर्षे पूर्ण झालीं होतीं. पण त्यांनीं लग्नपत्रिका काढल्या; आणि वुइल्यम ॲश्मील बार्टलेट् यांच्याशी आपण विवाह करणार आहोत, अशी घोषणा केली. आतांपर्यंतचा सारा काळ परोपकारांत आणि धर्मकृत्यांत गेलेला; आणि वयही सदुसष्ट वर्षांचें होऊन गेलेलें; अशा वेळीं बाईंना लग्न करण्याची बुद्धि व्हावी, याचें सर्वांना नवलच वाटले; आणि कांहीं कांहीं लोकांच्या मनांतून तर बाई थोड्याशा उतरल्या. लग्न केलें हें तर एक नवल होतेंच होतें; पण दुसरें नवल हें कीं, या सदुसष्ट वर्षांच्या बाईचा नवरा बार्टलेट् हा तीस वर्षाचा तरणाबांड पोऱ्या होता! हळू हळू लोकांना बसलेला आश्चर्याचा धक्का ओसरला; आणि बाईचें वैवाहिक जीवन फार सुखानें चालू आहे, हें कळल्यावर लोकांनाही बरें वाटू लागलें. एका वर्तमानपत्राच्या बातमीदारापाशीं बाई म्हणाल्या कीं, 'आतांपर्यंतचा माझा जन्म सुखानेंच गेला होता; पण आतांची ही माझी शेवटचीं वर्षे विशेषच सुखानें जात आहेत, असे मला वाटतें." बाईंनीं आपण होऊनच अशी जबानी दिल्यानंतर शंकेखोरांना आणि कुचुकुचूं करणारांना बोलायला जागाच उरली नाहीं. बाईचा संसार श्रीमंती थाटानें व मोठ्या सुखासमाधानानें चालू होता. घराचा थाट तर केवळ अलौकिक होता. वाडा नाना प्रकारच्या अलंकारांनी शृंगारलेला असून कलावंतांनी काढलेली चित्रे आणि बनविलेले पुतळे यांनी नटलेला होता. नाना प्रकारचे वेंचक पशुपक्षी बाईंनीं जमा केले होते. आल्यागेल्याची बडदास्त तर राजेशाही पद्धतीनें राहात होती. अशा प्रकारें जीविताची शेवटचीं सव्वीस सत्तावीस वर्षे बाईनीं फार सुखासमाधानानें घालविलीं; आणि १९०६ साली या उदार बुद्धीच्या वृद्ध स्त्रीचा अंत झाला.
● ● ●