Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बॅरनेस बर्डेट कूटस्
४३
 


बरें हायसें वाटलें, पांच वर्षे तुरुंगांत राहिल्यानें याची प्रेमाची तहान मरून जाईल, असा अंदाज तिनें केला; पण हा भाबडा गृहस्थ पांच वर्षांनीं तुरुंगांतून सुटल्याबरोबर पुन्हां त्यानें आपला लाळघोटेपणा चालू केला. परंतु शेवटी ही बाई बघत नाहीं, असें पाहून हा कंटाळला; आणि त्यानें आपलें प्रेमाचे सुकाणूं राजघराण्यांतील एका मुलीकडे वळविले. या प्रेमवेड्याकडे हळू हळू पोलिसांचे लक्ष जाऊं लागलें; आणि शेवटी त्यांनी त्याला एका वेडेखान्यांत नेऊन ठेवलें! बर्डेट ही एवढी श्रीमंत मुलगी आणि तिला आश्रयही थोरामोठ्यांचा पण या प्रेमवेड्याचें लफडें कायद्याचा आश्रय घेऊन तिला तोडून टाकतां येईना, याचें तिला नवल वाटलें. या माणसाचा तिला फारच उपसर्ग पोंचत होता. शेवटीं अशा रीतीनें त्याचा अंत झाला.
 मुक्या प्राण्यांचा छळ सगळीकडे नेहमींच होतो. बर्डेट हिचें लक्ष या प्राण्यांच्या हालांकडे जाऊं लागलें. या प्राण्यांना कठोर रीतीनें वागविणारांचा बंदोबस्त व्हावा, म्हणून प्रस्थापित झालेल्या संस्थेत बर्डेंट आरंभींच दाखल झाली होती. या कामी लागेल तेवढा पैसा ती खर्च करीत असेंच. लहानपणापासूनच मुलामुलींच्या ठिकाणीं पशूच्या संबंधानें करुणाबुद्धि उत्पन्न व्हावी, म्हणून निरनिराळ्या शाळांत या विषयांवरील निबंधाच्या स्पर्धा तिनें चालू केल्या; आणि उत्तम निबंध लिहिणांराना मुबलक बक्षिसें तिनें देऊं केलीं. टांग्याचे घोडे, ट्रामचे घोडे यांच्याकडेही तिचे लक्ष असे. जर मालक लोक किंवा हाक्ये त्यांना निर्दयपणानें वागवूं लागले, तर त्यांच्यावर पाळत ठेवून बर्डेट त्यांचा चांगला बंदोबस्त करून टाकी.
 १८४८ सालांत आयर्लंडमध्ये फार मोठा दुष्काळ पडला. तेव्हां तिनें तिकडील मिशनऱ्यांच्या हातीं एक लाख रुपये दिले; आणि त्यांतल्या त्यांत गरीब लोकांच्या भाकरीसाठीं या रक्कमेचा व्यय व्हावा, अशी व्यवस्था तिनें केली. रशिया व तुर्कस्तान यांचें युद्ध १८७७ साली सुरू झालें; आणि डॅन्यूब खोऱ्यांत रशियाची स्वारी येऊन पोचली. हजारों तुर्की लोक जीव घेऊन पळत सुटले. त्यांची अन्नान्नदशा झाली. थंडीचा कडाका पडला, बर्फाचीं वादळें होऊं लागलीं. हजारों लोक वाटेनें अत्यंत विपन्न स्थितीत इस्तंबूल येथे दाखल झाले. बादशहानें निरनिराळया मशिदींत त्यांना जागा दिलीं, राजवाड्याचीं मोठालीं दालनें खुलीं करून दिलीं, आणि लोकांनींही आपल्या घरांत त्यांना ठेवून घेतले. बर्डेटबाईंच्या कानीं हें वर्तमान आलें; आणि ज्यांच्यावर प्रसंग आला होता, ते मुसलमान असलें तरी