Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
कर्तबगार स्त्रिया
 


चाललेल्या असलांत, म्हणजे तुमच्याकडे पाहून या उदार कुमारिकेचें हृदय विदीर्ण होऊन जातें. ती तुम्हांला या सदनांत आश्रय देईल. येथें तुम्हांला कोणी वाईट-वाकटे बोलणार नाहीं. तुमच्या आजवरच्या पातकांचा उल्लेख येथें कोणी करणार नाहीं. येथें तुम्हांला कोणी हिणवणार नाही; आणि तुम्हीं पातकी स्त्रिया म्हणून तुम्हांला कोणी निराळें चोळीलुगडेंही देणार नाहीं; येथें राहणाऱ्या सर्वाना सारखेच पोशाख मिळतील. पश्चात्तापानें दग्ध होऊन तुम्हीं तेथें एकदां राहूं लागला, तरी इतर समाजापासून तुम्हांला मुद्दामच दूर दूर ठेवावें, अशाही या थोर स्त्रीची इच्छा नाहीं. हळू हळू तुम्हांला समाजांत प्रविष्ट करून घ्यावें, तुम्हांला आणि लोकांना तुमच्या पूर्वचरित्राचा विसर पडला म्हणजे, तुम्हीं वाटल्यास कोठेही दूरदेशीं जावें, आपल्या पसंतीच्या पुरुषांशीं लग्ने करावी; आणि तुम्हीं सुखानें संसार करावा, अशी या स्त्रिची इच्छा आहे."
 बाईच्या तर्फे डिकन्स यानें पाठवलेल्या या पत्रांना कितीतरी बायांनीं भराभर उत्तरें दिलीं; आणि त्या या सदनांत येऊन राहू लागल्या. या सदनाला 'युरेनिया कॉलेज' असें नांव मिळालें. आपण येथें रहात आहों; तर आतां आपण अब्रूदार स्त्रिया झालों आहों, असें या बायांना वाटू लागे; आणि मिळालेली पत वाढविण्यासाठी त्या अधिकच नेकीनें आणि सचोटीनें वागूं लागल्या. हळू हळू बर्डेटला दिसूं लागलें कीं, आपण दाखवलेले दातृत्व वांया गेलेलें नाहीं. नवे संसार उभे रहात आहेत, नवीं जोडपीं गुण्या गोविंदाने नांदत आहेत, आणि त्यांची घरे मुलाबाळांनी भरून गेलीं आहेत. 'युरेनिया कॉलेज' ची ही कल्पना एकंदर समाजालासुद्धां मोठी अद्भुत वाटली.
 एकीकडे बर्डेट हिच्या औदार्याचा आणि डिकन्सच्या मार्गदर्शनाचा असा एक विलास चालू असतांना, दुसरीकडे एका तरुण माणसाच्या मनांत एक निराळाच विकल्प उत्पन्न झाला. या माणसाचें नांव ड्यून असें होतें. याच्या मनानें घेतलें कीं, जर ही कुमारी एवढी सुंदर आहे, आणि श्रीमंत आहे, आणि जर आपलें मन तिच्यावर बसलेलें आहे, तर तिला प्रत्यक्ष मागणी घालावयास कांहींच हरकत नाहीं. 'माझें तुमच्यावर फार प्रेम आहे,' येवढेच त्यानें पत्रांत म्हटलें असतें, तर तिकडच्या पद्धतीप्रमाणें बर्डेटला विशेषसें कांहींच वाटलें नसतें. अशा प्रकारचीं अनेक पत्रे तिच्याकडे आतांपर्यंत आलेली होतीं. पण या डयूकचें, प्रेम' थोडें अनावरच झालें; आणि शिष्टाचाराची मर्यादा ओलांडून तो बर्डे