| हिनेंच पहिल्याने गरिबांच्या झोपड्या नष्ट केल्या! |
बॅरनेस बर्डेट कूटस् : ४ :
बॅरनेस बर्डेट कूटस् या इंग्रज स्त्रीचें चरित्र खरोखरच मोठें मननीय आहे. नशिबाचा योग, स्वतःची प्रवृत्ति, थोर पुरुषांचें साहचर्य आणि उदार माणसांचें मार्गदर्शन यांचा एक मोठा मनोज्ञ मिलाफ या बाईच्या चरित्रांत झाला; आणि व्हिक्टोरिया राणीच्या खालोखाल तिला इंग्लंडांतील प्रजा मानूं लागली!
हिचें पहिले नांव ॲजिला जॉर्जिना असें होतें. तिचा जन्म १८१३ च्या एप्रिल महिन्यांत झाला. तिसऱ्या जॉर्जच्या कारकीर्दीत सर फ्रान्सिस बर्डेट या नांवाचा जो एक उदारमतवादी मुत्सद्दी इंग्लंडांत होऊन गेला, त्याची ही शेवटची मुलगी होय. हिची आई साफिया ही इंग्लंडांतील थॉमस कूटस् या नांवाच्या एका श्रीमंत पेढीवाल्याची मुलगी होती. दोन्ही घराण्यांतील माणसें उच्च कुलांत आणि श्रीमंतींत वाढलेली असली, तरी त्यांच्या ठिकाणीं गरिबांच्या संबंधीचा जिव्हाळा विशेष असे. रिफॉर्म बिलाच्या वेळीं सामान्य लोकांच्या बाजूनें जे विशेष झगडणारे लोक होते, त्यांत तिच्या वडिलांची गणना होत असे. त्यांनी हा झगडा इतक्या त्वेषाने केला, कीं राजानें त्यांची रवानगी शेवटीं टॉवर ऑफ लंडन या इतिहासप्रसिद्ध तुरुंगांतच केली! त्यांना पकडतांना सुद्धां सरकारी पोलिसांना मोठीच मारामारी करावी लागली; आणि लोकांनीं पोलिसांवर दगडांचा वर्षाव केला. हा सर फ्रान्सिस १८४४ मध्ये वारला; आणि थोड्याशा दिवसांत त्याची बायकोही वारली व जॉर्जिना पोरकी बनली.
तिकडे आजोळच्या घराण्यांत एक मोठा चमत्कारिक फरक पडला. जॉर्जिनाची आजी वारली. आणि श्रीमंत पेढीवाले जे आजोबा, त्यांनीं चौऱ्यांशी वर्षांच्या वयाला एका देखण्या नटीशीं लग्न लावलें. कांहीं दिवसांनीं थॉमस कूटस् हा वृद्ध नवरदेव मरण पावला. पण या नटीवर त्याचा जीव इतका जडला होता, की पहिल्या बायकोच्या प्रजेला कांहीही न ठेवतां त्यानें आपली सर्व जिनगी या