जतां तरी कसें? स्त्रियांनीं आत्तांपर्यंत रणांगणाची हवा पाहिलेली आहे; आपल्या भोंवती रक्तामांसाचा सडा झालेला त्यांनीं पाहिला आहे; आणि मरत असलेल्या घायाळांच्या किंकाळ्या त्यांनीं कानांनी ऐकलेल्या आहेत. तसेंच अशा ठिकाण जाऊनही स्त्रियांनी घायाळ पुरुषांच्या प्रकृतीची वास्तपुस्त केली आहे. हीं कामें त्यांनीं केल्यामुळे त्यांच्या अंगांतील स्त्रीत्व कमी झाल्याचे वर्तमान तुम्हीं कधीं ऐकलें आहे काय?'
असल्या प्रतिप्रश्नांनीं श्रोत्यांचीं मनें फॉसेट्बाई सहज हस्तगत करीत असल्या पाहिजेत, हे उघड आहे. त्यांची लोकप्रियता भराभर वाढू लागली. तथापि यशाचा उन्माद त्यांना केव्हांच आला नाहीं. प्रतिपक्षाचें म्हणणें काय आहे, त्याच्या अडचणी कोणच्या आहेत, याकडे त्या विधायक बुद्धीनें लक्ष देत; आणि आपल्या कुशल वाक्-पाटवानें त्या सर्वांचा निरास करीत. अर्थातच स्त्रियांच्या मतदानाच्या चळवळीला जोराची भरती येत चालली; आणि मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठीं त्यांनी १८९५ साली केलेल्या अर्जावर अडीच लक्ष स्त्रियांनीं सह्या केल्या.
या सर्वाचा परिणाम काय झाला, हे आपल्याला माहीत आहे. आज इंग्लिश स्त्रीचें जीवित पुरुषांच्या जाचांतून बहुतांशीं मुक्त झालें आहे; आणि तिचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीला आलेला आहे. या यशाचे श्रेय सर्वथा फॉसेट्बाईचेंच नसले, तरी त्याचा फार मोठा वाटा इंग्लंडचा आजचा स्त्रीसमाज त्यांच्याच पदरांत टाकील, यांत कसलाही संदेह नाहीं. इंग्लंडांतील स्त्रियांचे बंधविमोचन डोळे भरून पाहून सुखी झालेली ही स्त्री १९२९ साली मरण पावली.
● ● ●